निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता तिहार तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आलं. आज सकाळी साडेपाच वाजता मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) या चारही आरोपांनी तिहार तुरुंगामध्ये फासावर लटवण्यात आलं. डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. मागील सात वर्षांपासून सुरु असणारा हा खटला अगदी फाशीच्या काही तास आधीपर्यंत सुरु होता. अखेर न्यायालयाने या चौघांना फाशीच देण्यात यावी यावर ठाम असल्याचे सांगितल्यानंतर आज या चौघांना फाशी देण्यात आली. मात्र या प्रकरणामधील सहा आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली तर सहावा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला तीन वर्ष बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याला मुक्त करण्यात आलं आहे.

संपूर्ण देशाला हदरवून सोडणाऱ्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील सहावा आरोपी अल्पवयीन असल्याने तीन वर्ष बाल सुधारगृहात घालवल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं आहे. १६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील मुनीरका भागात ६ जणांनी एका पॅरामेडिकलला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. निर्भयासोबत तिचा मित्रही होता. मात्र या दोघांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही चालत्या बसमधून बाहेर फेकण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी १८ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली पोलिसांनी राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केली. त्यानंतर  २१ डिसेंबर २०१२ दिल्ली पोलिसांनी अक्षय आणि सहवा आरोपी म्हणून एका अल्पवयीन मुलाला अटक केली. पिडित तरुणीवर २९ डिसेंबर २०१२ पर्यंत दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तिला सिंगापूरला पाठवण्यात आलं. सिंगापूरला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

३ जानेवारी २०१३ रोजी पोलिसांनी पाच जणांविरोधात सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि लूटमार या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर १७ जानेवारी २०१३ रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने पाचही दोषींवर आरोप निश्चित केले. दरम्यान ११ मार्च २०१३ रोजी तिहार तुरुंगात या प्रकरणातला प्रमुख आरोपींपैकी एक असणाऱ्या राम सिंह याने आत्महत्या केली. त्यानंतर सात महिन्यांनी म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल बोर्डाने दोषी ठरवलं आणि त्याची रवानगी तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली. अटक झाल्यापासून म्हणजे २१ डिसेंबर पासून या अल्पवयीन मुलाच्या अटकेचा कालवधी गृहित धरण्यात आला. त्यामुळे २० डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीची बालसुधारगृहामधून मुक्तता करण्यात आली.

अल्पवयीन गुन्हेगाराला सोडण्यात येऊ नये यासाठी त्याच्या सुटकेच्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर २०१५ रोजी दिल्लीच्या महिला आयोगाने ही सुटका रोखण्यासाठी शनिवारी रात्री उशीरा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली.

तो सध्या काय करतो?

पीटीआयच्या हवाल्याने २०१७ साली ५ मे रोजी वेगवेगळ्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या वृत्तानुसार हा अल्पवयीन मुलगा सध्या दक्षिण भारतामध्ये आहे. तो तिथे एका हॉटेलमध्ये स्वयंपाक्याचे काम करतो. बालसुधारगृहामध्ये असताना त्याने स्वयंपाक करण्याचे प्रशिक्षण घेतलं. या मुलामध्ये पूर्णपणे बदल झाला असून त्याने आपले नावही बदललं आहे अशी माहिती बालसुधारगहाशी संबंधित सेवाभावी संस्थेच्या एका अधिकाऱ्याने दिली. “बालसुधारगृहामधून बाहेर पडल्यानंतर या मुलाला कोणीही ओळखू नये आणि त्याचा त्याला भविष्यातील वाटचालीवर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही त्याला दिल्लीपासून खूप दूर पाठवलं आहे. तेथे त्याने त्याचं नवं आयुष्य सुरु केलं आहे,” असंही या अधिकाऱ्याने सांगितलं. दक्षिणेतील एका किनारपट्टीच्या शहरामधील हॉटेलमध्ये हा मुलगा आचारी म्हणून काम करतो. त्याला नोकरी देणाऱ्या हॉटेल मालकाला त्याचा भूतकाळ ठाऊक नाही. “त्याला कोणी ओळखू नये म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेत असून वेळोवेळी आम्ही त्याची माहिती घेत असतो,” असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

हाच अल्पवयीन सर्वात क्रूर होता का?

या प्रश्नासंदर्भात बोलताना एनजीओच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये या मुलाचा सहभाग होता हे मान्य केलं आहे. मात्र हिंसेमध्ये हाच मुलगा आघाडीवर होता आणि त्यानेच सर्वात क्रूर वागणूक पिडितेला दिली असा प्रसारमाध्यमांनी केलेला दावा बिनबुडाचा असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या मुलाची न्युविलियन जस्टीस बोर्डासमोर सुनावणी झाली त्यावेळी हा अधिकारी उपस्थित होता. या सुनावणीदरम्यानच या मुलाने सर्वात हिंसक वागणूक दिल्याचा दाव्याला कोणताही पुरावा अढळून आला नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

आणि तो अडकला

हा मुलगा राम सिंगसाठी (आत्महत्या केलेला आरोपी) काम करायचा. राम सिंगकडे या मुलाचे आठ हजार रुपये शिल्लक होते. हा मुलगा सतत राम सिंगकडे या पैशांबद्दल चौकशी करायचा. त्या रात्री हा मुलगा हेच पैसे आणण्यासाठी राम सिंगकडे गेला होता आणि त्यामुळेच हा मुलगा या प्रकरणामध्ये अडकला, असंही या अधिकाऱ्याने सांगितले. हा मुलगा मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. मात्र सध्या तो दक्षिणेमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतोय.