दिल्लीतील बहुचर्चित निर्भया प्रकरणातील पिडितेला अखेर सात वर्षांनंतर न्याय मिळाला. २० मार्च २०२० ला सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धा तास महत्त्वाचा होता. अखेरच्या टप्प्यात दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. दोषींनी रडारड करून आणि लादीवर लोळून बचावाचा प्रयत्न केला, अखेर या चौघांना सकाळी साडे पाचच्या सुमारास फासावर लटकवण्यात आले. निर्भयाला न्याय मिळाल्याचे समाधान निर्भयाच्या आई वडिलांइतकेच आणखी एका व्यक्तीलाही झाले. ती व्यक्ती म्हणजे ‘त्या’ दुर्दैवी घटनेच्या संध्याकाळी निर्भयाबरोबर असणारा तिचा मित्र.
“निर्भया, आम्हाला उशीरच झाला”; भाजपा खासदार गंभीरची कबुली
त्या दुर्दैवी संध्याकाळी तो मित्र निर्भयाबरोबर होता. त्याच्याबरोबर निर्भया चित्रपट पाहून परतत होती, त्याच वेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. निर्भयाचा तो मित्र या घटनेचा एकमेव प्रत्यतक्षदर्शी आहे. त्या घटनेनंतर गेल्या सात वर्षात त्यानेदेखील खूप काही सोसलं आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार या खटल्या दरम्यान त्याच्यावरही काही आरोप करण्यात आले. मात्र सध्या तो मित्र या सगळ्या गोष्टींपासून दूर परदेशात वास्तव्यास आहे.
निर्भयाचा तो मित्र तीन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकला. सध्या तो त्याच्या पत्नीसह परदेशात असून तो तेथेच नोकरी करतो आहे. त्याला एक मुलगादेखील आहे. एका वृत्तानुसार जेव्हा निर्भयाच्या बलात्काऱ्यांना जेव्हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा ‘त्या’ मित्राला फार आनंद झाला होता. निर्भयाच्या त्या मित्राचे वडिल त्यांच्या शहरातील नावाजलेले वकील आहेत. २०१७ मध्ये त्यांनीच त्यांच्या मुलाच्या विवाहाची माहिती दिली होती.
सात वर्षांपूर्वी १६ डिसेंबरच्या संध्याकाळी निर्भया आणि तो मित्र एकत्र होते. त्या मित्राने निर्भयाला वाचवण्याचा सर्वतोपरि प्रयत्न केला, पण त्या चौघांनी त्यालाही अर्धमेल्या अवस्थेत फेकून दिले होते.