दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार आज सुटणार आहे. दिल्लीच्या महिला आयोगाने ही सुटका रोखण्यासाठी शनिवारी रात्री उशीरा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  मात्र, या प्रकरणाची सुनावणी सोमवारी करण्यात येईल असे न्यायालयाने स्पष्ट करत अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यासही नकार दिला. त्यामुळे आज निर्भयाच्या अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका होणार आहे.
दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी रात्री उशिरा गुन्हेगाराच्या सुटकेविषयी फेर विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी सरन्यायाधीशांच्या निवास्थानी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रजिस्ट्रारांची भेट घेतली आणि यांसदर्भातील महत्वाची कागदपत्रे सादर केली असल्याची माहिती स्वाती मालीवाल यांनी दिली. मध्यरात्री एकच्या सुमारास स्वाती मालिवाल यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली. मात्र दोषीच्या सुटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार तर दिला आणि याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होईल असे स्पष्ट केले.
तीन वर्षांपूर्वी १६ डिसेंबरला निर्भयावर नृशंस बलात्कार झाला होता. त्यावेळी बलात्काऱ्यांनी तिच्यावर केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे १३ दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. त्यावेळी अवघ्या देशभरात या नराधमांविरोधात संतापाची लाट उसळली होती. तिने मृत्यूशी दिलेली चिवट झुंज अपयशी ठरल्यानंतर सगळ्या जगभर हळहळ व्यक्त झाली होती. पण, तिच्या धैर्यशीलतेमुळे अवघा देश तिला ‘निर्भया’ नावाने ओळखू लागला होता.

Story img Loader