केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मुलीचं लग्न गुरुवारी पार पडलं. त्यांची मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू प्रतीक दोशी यांच्याशी कर्नाटकमध्ये झाला. या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंब व जवळचे मोजकेच लोक उपस्थित होते. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वांगमयी व प्रतीक यांचा विवाहसोहळा हिंदू रितीरिवाजानुसार पार पडला. वांगमयी ही मिंट लाउंजच्या पुस्तक व संस्कृती विभागासाठी लेखिका म्हणून काम करते, तर प्रतीक दोशी २०१४ पासून पंतप्रधान कार्यालयात काम करतात. लग्नाच्या व्हिडीओनंतर अर्थमंत्र्यांचे जावई नेमके कोण आहेत, याबद्दल चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
कोण आहेत प्रतीक दोशी?
मुळचे गुजरातचे असलेले प्रतीक दोशी हे पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २०१४ नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्यावर दोशी दिल्लीच्या पॉवर कॉरिडॉरमध्ये गेले. तर, दुसऱ्या टर्मनंतर म्हणजे जून २०१९ मध्ये त्यांना संयुक्त सचिव पदावर बढती देण्यात आली.
प्रतीक दोशी यांचं शिक्षण
प्रतीक दोशी यांनी सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रतीक मुख्यमंत्री कार्यालयात रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होते.
प्रतीक दोशींच्या कामाचे स्वरुप
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक दोशी पीएमओच्या संशोधन आणि धोरण विभागाचे काम पाहतात. याशिवाय पंतप्रधानांना सचिव स्तरीय मदत करणे ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसेच ते काही महत्त्वपूर्ण विषयांमध्ये मोदींना सल्लेही देऊ शकतात.
प्रतीक दोशी हे पंतप्रधान मोदींचे खूप जवळचे मानले जातात. त्यांना मोदींचे कान आणि डोळेही म्हटलं जातं. ते सरकारमधील उच्च ब्युरोक्रॅट्स आणि इतर महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांचं बारीक निरीक्षण करतात. तसेच जेव्हा पंतप्रधान कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्णय घेतात, तेव्हा प्रतीक त्यांना सगळी माहिती देऊन निर्णय घेण्यास मदत करतात. महत्त्वाची बाब म्हणजे प्रतीक कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाहीत.