राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीच्या सौद्यावरून काँग्रेसने केलेले आरोप लज्जास्पद आहेत अशी टीका संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अशा आरोपांमुळे सुरक्षा दलांचा आत्मविश्वास कमी होतो, यूपीएच्या काळात या विमानांची किंमत लावली जात होती त्यापेक्षा चांगल्या किंमतीत आम्ही विमाने खरेदी केली असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी झालेल्या पत्रकारांच्या संमेलनात त्या बोलत होत्या. सैन्य दलाचे आधुनिकीकरण काँग्रेसच्या कार्यकाळात रोखण्यात आले होते असाही आरोप सीतारामन यांनी केला. त्याचमुळे ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणे आवश्यक होते असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या कार्यकाळात सैन्य दलांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतलेच गेले नाहीत. वायुसेनेच्या शस्त्रसाठ्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्याची नितांत गरज होती. मात्र १० वर्षांमध्ये काँग्रेसने एकही निर्णय घेतला नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही वायुदल असो किंवा नौदल वा लष्कर सगळ्यांचेच बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अशात काँग्रेस या प्रश्नाचेही राजकारण करत आहे हे दुर्दैवी आहे असेही सीतारामन यांनी म्हटले. राफेल विमानांच्या खरेदीत सगळ्या प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत.
राफेल या ३६ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत सुमारे ५९ हजार कोटींचा सौदा झाला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बड्या व्यावसायिकाला फायदा होण्यासाठी या सौद्यामध्ये फेरफार केले असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. मात्र राहुल गांधी यांच्या याच वक्तव्याचा निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला आहे. तसेच वायुसेना प्रमुखांनीही राफेल विमानांच्या खरेदीत जास्त किंमत मोजण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.