Nirmala Sitharaman केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत प्राप्तीकर विधेयक २०२५ सादर केलं आहे. लोकसभेच्या पटलावर मी हे विधेयक ठेवते आहे असं त्या म्हणाल्या. त्यावेळीही विरोधकांचा गदारोळ सुरुच होता. तसंच काही विरोधकांनी हे विधेयक सादर होण्याआधीच सभागृहाचा त्याग केला. ए.के. प्रेमचंदन यांनी घेतलेले आक्षेप योग्य नाही. प्राप्तीकराचा कायदा १९६१ मध्ये तयार झाला. त्यावेळी त्यात २१९ कलमं. मात्र वर्षानुवर्षे यात नवी कलमं समाविष्ट करण्यात आली. आता या कायद्यातील कलमांची संख्या ८१९ आहे अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?

आता आम्ही ५६१ कलमांचं विधेयक घेऊन आलो आहोत. मनिष तिवारी म्हणाले की नव्या प्राप्तिकर विधेयकात जास्त कलमं आहेत मात्र ते तसं नाही. आम्ही ८१९ कलमांऐवजी आता ५६१ कलमांचं विधेयक घेऊन आलो आहोत. आत्तापर्यंतच्या विधेयकात ४ हजारांहून अधिक वेळा सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे मनिष तिवारी यांनी बहुदा हे विधेयक पाहण्याचेही कष्ट घेतले नसावेत असा टोला निर्मला सीतारमण यांनी लगावला.

विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. आम्ही हे सांगू शकतो या की या विधेयकात आम्ही यांत्रिक नाही तर धोरणात्मक बदल केले आहेत. असंही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. भारतीय कर प्रणालीमध्ये अनेक वर्षांमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत, ज्यामुळे १९६१ चा प्राप्तिकर कायदा अधिकाधिक गुंतागुंतीचा झाला आहे. सध्याच्या कर फ्रेमवर्कमध्ये अशा अनेक सूट, वजावट आणि तरतुदींचा समावेश आहे; ज्यामुळे अनेकदा करदात्यांमध्ये गोंधळ होतो आणि कर विभाग व व्यक्ती किंवा व्यवसाय यांच्यात वाद निर्माण होतात. सरकार अनेक वर्षांपासून करविषयक कायदे सुलभ करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आहे.

विधेयकाचा तुमच्यावर कसा परिणाम होईल?

मध्यमवर्गीयांनी दीर्घकाळापासून कर सवलतीची मागणी केली आहे आणि २०२५ च्या अर्थसंकल्पात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लक्षणीय कर कपात करण्यात आली आहे. निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात कर दायित्वांमध्ये लक्षणीय कपात करण्याची घोषणा केली. नवीन आयकर विधेयक कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि कमी बोजा देणारी आणि या बदलांवर आधारित असेल, त्यामुळे पगारदार व्यक्ती, छोटे व्यावसायिक आणि स्वयंरोजगार व्यावसायिकांना अधिक पारदर्शक कर प्रणालीचा फायदा होईल; ज्यामुळे कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्यासाठी लागणारा खर्च कमी होईल आणि फाइलिंगची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

हेही वाचा

Story img Loader