केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत निर्मला सीतारमण यांनी टीका केली आहे. अदाणी प्रकरणावरून राहुल गांधी सध्या आक्रमक झाले आहेत. अदाणींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुठून आले? असा प्रश्न विचारत आहेत. यावर आता निर्मला सीतारमण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे निर्मला सीतारमण यांनी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करण्याची राहुल गांधींना सवय आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीही आपल्याला सगळ्यांनाच याचा प्रत्यय आला आहे. आता पुन्हा एकदा अदाणी अदाणी हे नाव घेत ते अकारण बिनबुडाचे आरोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटे आरोप करून राहुल गांधी तोंडावर पडतात तरीही त्यातून बोध घेत नाहीत असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
केरळ सरकारने अदाणी यांना केलेल्या मदतीविरोधात आणि राजस्थानच्या कंपनीने जे सौर उर्जा योजनेचं काम अदाणींना दिलं आहे त्याबाबत राहुल गांधी काहीच का बोलत नाहीत? याबाबत बोलण्यासाठी राहुल गांधींना कुणी अडवलं आहे असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणखी काय म्हणाल्या?
तत्कालीन काँग्रेस सरकार केरळमध्ये असताना एका बंदरासंदर्भातला प्रकल्प कुठलीही निविदा न काढता अदाणींना देण्यात आला होता. आता केरळमध्ये काँग्रेसचं सरकार नाही तिथे माकपची सत्ता आहे मात्र त्याबाबत राहुल गांधी यांनी सोयीस्कर मौन स्वीकारलं आहे.