Nishikant Dubey काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.संपूर्ण जगाने या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा जीव गेला. हे सगळे निरपराध पर्यटक होते. दरम्यान भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ संपेपर्यंत पाकिस्तानचे चार तुकडे करतील असा दावा केला आहे.
दहशतवादी हल्ल्याबाबत काय म्हणाले निशिकांत दुबे?
पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यात २६ भारतीय पर्यटकांना जीव गमावावा लागला. ही घटना दुर्दैवी आहे. मात्र आपल्या सुदैवाने देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पाकिस्तानला ते नक्की धडा शिकवतील. १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा त्यांच्या पाठिशी आहे. तसंच मोदींच्या नावाचा डंका जगभरात वाजत असतो. या दहशतवाद्यांना आम्ही कल्पनेपलिकडची शिक्षा देऊ असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी घोषणा केली त्यामुळे दहशतवाद्यांचं धाबे दणाणले आहेत असंही निशिकांत दुबेंनी म्हटलं आहे.
निशिकांत दुबे यांचा दावा काय?
“मी खात्रीने सांगतो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ वर्षे संपेपर्यंत पाकिस्तानचे चार तुकडे करतील. बलुचिस्तान, पख्तूनिस्तान, पंजाब आणि सिंध असे प्रांत करुन पाकिस्तानचे चार तुकडे केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करुन दाखवतील.” असा दावा निशिकांत दुबेंनी केला आहे. निशिकांत दुबे पुढे म्हणाले, “आता या सापांना पाणी पाजण्याची नाही तर त्यांना चिरडण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलली जातील. तसंच लवकरच मोदींच्या नेतृत्वात पाकिस्तानचे चार तुकडे केले जातील” असा दावा निशिकांत दुबेंनी केला आहे.
दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आज (28 एप्रिल) आठवडा पूर्ण झाला आहे. तर दुसरीकडे या भ्याड हल्ल्याचे अनेक पैलू समोर येत आहे. अशातच या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग प्राप्त झाला आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरु झाली आहे.