BJP MP Nishikant Dubey: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. यानंतर दुपारपासून या विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू आहे. दरम्यान सत्ताधारी मंत्री आणि खासदारांनी या विधेयकाच्या बाजून मते व्यक्त केली आहेत. तर, विरोधी पक्षांच्या खासदारांनी याला विरोध केला आहे.
झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार निशिकांत दुबे यांनी वक्फ विधेयकावरील चर्चेत, वक्फ बोर्डात गैर-मुस्लिमांचा समावेश का असावा असा प्रश्न करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना लक्ष्य केले. यावेळी दुबे यांनी असा प्रश्न केला की, जर गैर-मुस्लिम लोक वक्फ बोर्डाला मोठे दान करू शकतात, मक त्यांच्यापैकी कोणी बोर्डात का असू शकत नाही?
यावेळी बोलताना निशिकांत दुबे यांनी दावा केला की, “भारतात मुहम्मद घोरी यांनी वक्फ सुरू केले. जिन्नांनी पाकिस्तानची निर्मिती केली आणि आज पुन्हा एकदा वक्फच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहेत.”
भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?
“१९५४ मध्ये संसदेच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करूनही, काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना खुश करण्यासाठी वक्फ कायदा मंजूर केला. वक्फला दुसऱ्या कोणत्याही देशात असे अधिकार देण्यात आले नाहीत, तुम्हाला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे का?”, असा सवालही भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी यावेळी केला.
अमित शाह काय म्हणाले?
वफ्क दुरूस्ती विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत म्हटले की, “महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. याचबरोब बीडमधील कंकालेश्वर मंदिराची १२ एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती.”
विरोधकांकडून टीका
दुसरीकडे या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडकडून विरोध केला आहे. यामध्ये काँग्रेस खासदार गौरव गौगोई, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सभागृहातून याला विरोध केला.
देशाला परिणाम भोगावे लागतील
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सभागृहाबाहेरून यावर टीका केली. त्या म्हणाल्या “ते (भाजपा) विसरले आहेत की, आज त्यांचे सरकार आहे पण उद्या त्यांचे सरकार राहणार नाही. ते जाईपर्यंत संपूर्ण देश उद्ध्वस्त झालेला असेल. सध्या सत्तेत असलेले भाजपा सरकार मुस्लिमांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे. येत्या काळात संपूर्ण देशाला याचे परिणाम भोगावे लागतील.”