श्रीनगर एनआयटीमधील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी काश्मीरमध्ये दाखल झालेले अभिनेते अनुपम खेर यांना पोलिसांनी विमानतळावरच रोखले व त्यांना संस्थेमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली.
आज सकाळी अनुपम खेर श्रीनगर विमानतळावर दाखल होताच काश्मीर पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना एनआयटी कॅम्पसमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तसेच,  असंतोष आणि असुरक्षिततेच्या मुद्द्यावर संस्थेतील परराज्यातील विद्यार्थ्यांना समर्थन आणि पाठींबा देण्यासाठी राष्ट्रध्वज घेऊन जाणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवून दिल्लीच्या दिशेने माघारी पाठवले आहे.
सध्या श्रीनगरमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडिजकडून वादाला तोंड फुटले होते.  भारताचा वेस्ट इंडीजकडून पराभव झाल्यानंतर काश्मीरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. याला परराज्यातील विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी परराज्यातील विद्यार्थ्यांनी एनआयटी संस्थेच्या परिसरात तिरंगा फडकावत राष्ट्रगीत गायले होते. त्यावेळी काश्मिरी विद्यार्थ्यांनी याला विरोध केल्याने वाद झाला. वादानंतर पोलिसांनी परराज्यातील विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता.

Story img Loader