Nithin Kamath Viral Linkedin Post: झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी आधुनिक मोबाइल अॅप्लिकेशन्सच्या डेटा पद्धतींबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मोबाइल युजर्सना आक्रमक ट्रॅकिंग आणि अनैतिक मार्गाने डेटा ट्रॅकिंगच्या वाढत्या ट्रेंडबद्दल इशारा दिला आहे.
लिंक्डइनवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये कामथ यांनी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वापरल्या जाणाऱ्या “स्कॅमी” युक्त्यांवर टीका केली आहे. नितीन कामथ यांनी असे म्हटले आहे की, “आज अनेक अॅप्स गोंधळलेले आणि फसवे आहेत. ते युजर्सच्या संमतीशिवाय त्यांच्या डेटाचा गैरवापर करत आहेत.”
आपल्या पोस्टमध्ये नितीन कामथ यांनी पुढे म्हटले आहे की, “आज बहुतेक अॅप्स निरुपयोगी झाले आहेत. ते युजर्सवर त्रासदायक नोटिफिकेशन्स आणि स्पॅम मेसेजेसचा भडिमार करतात. यातील बरेच नोटिफिकेशन्स आणि मेसेजस पूर्णपणे फसवे असतात.”
यात मोठा धोका हा आहे की…
“स्पॅम नोटिफिकेशन्सच्या त्रासापेक्षा, हे अॅप्स शांतपणे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक माहिती कशी गोळा करतात यात मोठा धोका आहे. अनेक अॅप्स केवळ अॅपमध्ये युजर काय करतो याचा मागोवा घेत नाहीत तर त्यांच्या इतर अॅप्समधील वापराचेही निरीक्षण करतात. पुढे हा डेटा जाहिरातींसाठी थर्ड पार्टी कंपन्यांना विकला जातो,” असे नितीन कामथ यांनी पुढे त्यांच्या लिंक्डइनवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
तुमच्या डिव्हाइसवरील मीडियाही होतो ट्रॅक
“तुमच्या माहितीशिवाय, तुमच्या फोनवरील असंख्य अॅप्स विस्तृत डेटा ट्रॅक करतात आणि त्याची माहिती गोळा करतात. यामध्ये तुम्ही कोणते अॅप्स इन्स्टॉल केले आहेत, तुम्ही ते कसे वापरता, तुमच्या ईमेल आणि मेसेजेसमधील कन्टेंन्ट व तुमच्या डिव्हाइसवरील मीडियाचाही समावेश असतो. यामधील आणखी एक त्रासदायक गोष्ट म्हणजे काही अॅप्स केवळ त्यांच्याच नव्हे तर युजरच्या इतर अॅप्सचा वापरदेखील ट्रॅक करतात”, असेही कामथ यांनी स्पष्ट केले आहे.
युजर्सना गुंतवून ठेवणारी फिचर्स
कामथ यांनी यावर भर दिला की, हा डेटा प्रामुख्याने युजर्सच्या वर्तणुकीचे तपशीलवार प्रोफाइल तयार करण्यासाठी वापरला जातो, ज्यामुळे अत्यंत वैयक्तिकृत जाहिरात दाखवण्यास मदत होते आणि तंत्रज्ञान कंपन्यांचा जाहिरात महसूल वाढतो. याव्यतिरिक्त, त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की काही अॅप्स वर्तनात्मक अंतर्दृष्टी वापरून युजर्सना जास्त काळ गुंतवून ठेवणारी फिचर्स डिझाइन करतात.