अयोद्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवखे काही तास बाकी आहेत. अयोध्येत सध्या या कार्यक्रमाची लगबग चालू आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत मोठा उत्सव होणार आहे. या युत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला देशभरातील लोकांना या उत्सवामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विशेष प्रयत्न करत आहे. मंदिर समितीने आतापर्यंत हजारो लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारीदेखील या कामात मंदिर समितीची मदत करत आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, देशभरातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, कलाकार, खेळाडू, कारसेवक आणि साधू-संथांसह सात हजाराहून अथिक लोकांना आतापर्यंत निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. अशातच स्वयंघोषित संत-धर्मगुरू आणि बलात्कारासह अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणातील आरोपी नित्यानंद यांनी दावा केला आहे की त्याला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. तसेच तो या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
स्वयंघोषित संत आणि बलात्कार, अपहरणासह विविध गुन्ह्यांमधील फरार आरोपी नित्यानंद याने दावा केला आहे की, उद्या (२२ जानेवारी) अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला तो उपस्थित राहणार आहे. त्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे.
नित्यानंद सध्या त्याच्या तथाकथित ‘कैलास’ या देशात राहतोय. त्याने स्वतःला हिंदू धर्माचा सर्वोच्च धर्मगुरू घोषित केलं आहे. त्याने एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत उद्या होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत म्हटलं आहे की, श्रीराम संपूर्ण जगावर कृपा करण्यासाठी उद्या अवतरणार आहेत. मी त्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. मला औपचारिकपणे आमंत्रित केल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
स्वतःचा वेगळा देश बनवणारा नित्यानंद कोण आहे?
या नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असून त्याचा जन्म १ जानेवारी १९७८ साली तामिळनाडू राज्यात झाला. त्याच्या वडीलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे. १९९५ साली नित्यानंदने मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. असे सांगितले जाते की, वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच त्याने रामकृष्ण मठात धार्मिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. १ जानेवारी २००३ रोजी त्याने स्वतःचा पहिला आश्रम बंगळुरुच्या बिदादी येथे सुरू केला. त्यानंतर त्याने अनेक ठिकाणी आश्रम सुरू केले. तो स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो.
हे ही वाचा >> बाबरी मशिदीचा निकाल देणाऱ्या खंडपीठातील ‘हे’ न्यायाधीश प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार
२०१० साली दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप नित्यानंदवर करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात त्याच्या पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. २०१९ साली गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला होता. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला. त्यानंतर त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वोडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेतलं. या बेटाला त्याने देश म्हणून घोषित केलं आहे. नित्यानंदने या देशाला ‘कैलास’ असं नाव दिलं असून हे जगातील सर्वोत्कृष्ट हिंदूराष्ट्र असल्याचा दावा त्याने अनेकदा केला आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याच्या देशाला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता द्यावी अशी विनंतीही त्याने केली होती. या देशाच्या निर्मितीसाठी तो गेले काही वर्षे निधी गोळा करत आहे. त्याच्या देशाा मान्यता मिळाली यासाठी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रयत्न करत आहे.