Nitin Gadkari Announces Cashless Treatment For Road Accident Victims: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात पीडितांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी सात दिवसांच्या उपचारांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या योजनेबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही कॅशलेस ट्रीटमेंट ही एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे अपघात झाल्यानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. या योजनेद्वारे पीडिताच्या उपचारांवर जास्तीत जास्त १.५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. याचबरोबर हिट अँड रन प्रकरणात मृत झालेल्या व्यक्तीसाठी सरकार दोन लाख रुपये देखील देणार आहे.”

दिल्लीतील भारत मंडपम येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. या बैठकीचा उद्देश वाहतूक धोरणांमध्ये सुधारणा करणे आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमधील सहकार्य वाढवणे हा होता.

पीडितांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत

यावेळी गडकरी यांनी असेही सांगितले की, हिट अँड रन अपघातात जीव गमावणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी होती. २०२४ मध्ये भारतात रस्ते अपघातात सुमारे १.८० लाख लोकांनी आपला जीव गमावला या चिंताजनक आकडेवारीचा हवाला देत त्यांनी रस्ते सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे अधोरेखित केले. त्यापैकी ३०,००० मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाले, असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

रस्ते अपघातात १० हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू

नितीन गडकरी यांनी बाल सुरक्षेच्या गंभीर मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले की, “२०२४ मध्ये शाळा आणि महाविद्यालयांजवळील पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे अंदाजे १०,००० मुलांना आपला जीव गमवावा लागला. सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून, ऑटोरिक्षा आणि शालेय मिनीबससाठी नवीन नियम लागू केले जातील, तर सुरक्षा उपायांचा भाग म्हणून अपघातांचे ‘ब्लॅक स्पॉट्स’ शोधून ते दुरुस्त केले जातील.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari announces cashless treatment scheme for road accident victims aam