भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत तिकीट न दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत होते. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर त्यात नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश असल्याचे दिसले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी आता प्रचाराला लागले आहेत. नुकतीच त्यांनी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीली एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या वादग्रस्त विधानाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला.
नितीन गडकरी काय म्हणाले?
कर्नाटकचे भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे म्हणाले होते की, जर भाजपाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर राज्यघटनेतील हिंदूविरोधी बदल पूर्ववत करण्यात येतील. या विधानावर उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, बहुमत मिळो किंवा न मिळो. संविधानात बदल करण्याचा आमचा विचार नाही. आम्ही तशी काही योजना बनविली नाही. संविधानात बदल करण्याबाबत जे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. लोकांमध्ये संभ्रम पसरविण्याचा हा प्रकार आहे, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
‘संविधानातील हिंदुविरोधी बदल काढण्यासाठी घटनादुरुस्ती करणार’, भाजपा खासदाराचे विधान
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार खासदार अनंतकुमार हेगडे यांनी मागच्या आठवड्यात एका सभेत बोलताना म्हटले की, भाजपाचे बहुमत आल्यानंतर काँग्रसने राज्यघटनेत जे हिंदूविरोधी बदल केले आहेत. ते बदल पूर्ववत केले जातील. हेगडे यांच्या विधानानंतर लगेचच भाजपाने त्यांच्या विधानापासून हात झटकले. हेगडे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. तसेच सदर विधानाबाबत खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असेही सांगण्यात आले.
विरोधकांनी मात्र ही संधी साधून भाजपावर टीका केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, भाजपा संविधानविरोधी आहे, हे पुन्हा एकदा हेगडे यांच्या विधानामुळे सिद्ध झाले. हेगडे यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ सालीदेखील त्यांनी अशाचप्रकारचे वादग्रस्त विधान केले होते. सततच्या वादग्रस्त विधानामुळे अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे, असे काही माध्यमांनी वृत्त दिले आहे.