केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना थेट भगवान श्रीकृष्णाशी केली आहे. योगी आदित्यनाथ हे श्रीकृष्णाप्रमाणे समाजकंटकांविरोधात कठोर पावले उचलत असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं.
हेही वाचा – भाजपविरोधात काँग्रेसच्या मदतीला ‘बीआरएस’, ‘आप’
काय म्हणाले नितीन गडकरी?
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये १० हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपुजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कामांचं कौतुक केलं. “योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं केली आहे. महोबा ही वीर योद्ध्यांची भूमी आहे. या भूमीला समृद्ध इतिहास आहे. झाशी-खजुराहो रस्त्याच्या निर्मितीमुळे राज्याच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमेवर असलेल्या कबराई सेक्शनच्यामुळे भोपाळ-कानपूर औद्योगिक क्षेत्राकडून लखनऊकडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल आणि वेळेची बचत होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – “अल्लाह बहिरा आहे का?” भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान!
योगी आदित्यनाथांची तुलना भगवान श्रीकृष्णाशी
पुढे बोलताना योगी आदित्यनाथ यांची थेट भगवान श्रीकृष्णाशी तुलना करत म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच माझ्या पत्नीने मला विचारलं की उत्तरप्रदेशमध्ये काय सुरू आहे? भागवत गीतेचा दाखल देत ती म्हणाली, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढतो, तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण जन्म घेतात. खरं तर योगी आदित्यनाथ यांनी श्रीकृष्णाप्रमाणेच वाई़ट प्रथा आणि समाजकंटकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो”