पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजप नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करणार नाही, असे राष्ट्रीय अध्यक्ष असताना आपण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आश्वासन दिल्याच्या वृत्ताचे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी खंडन केले आहे.
गडकरी यांची नितीशकुमार यांच्याशी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या निवासस्थानी जुलै २०१२ मध्ये भेट व चर्चा झाली होती. तत्कालिन राजकीय स्थितीचा आढावा घेऊन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रालोआच्या रणनितीवर तिन्ही नेत्यांनी त्यावेळी चर्चा केली होती. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयी भाजपने कोणताही निर्णय घेतला नसून त्याविषयी भाजपचे नेतृत्व रालोआतील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन योग्यवेळी चर्चा करेल, असे गडकरी आणि जेटली यांनी नितीशकुमार यांना सांगितले. मात्र, पंतप्रधानपदासाठी मोदी यांची उमेदवारी जाहीर करणार नाही, असे कोणतेही आश्वासन नितीशकुमार यांना गडकरी वा जेटली यांनी दिले नव्हते, असे आज गडकरींच्या वतीने त्यांचे कार्यकारी सचिव वैभव डांगे यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले.