केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची पश्चिम बंगाल मधील सिलिगुडीतील दागापूर येथे एका जाहीर कार्यक्रमात आज तब्येत बिघडली. भाषण सुरू असताना अचानक त्यांना भोवळ आली. यानंतर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक कार्यक्रमस्थळी पोहचले आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
पश्चिम बंगाल येथील सिलिगुडीमधील विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरींची तब्येत बिघडल्यानंतर सुकना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक बोलवण्यात आले. त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन गडकरी यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना त्रास झाला असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांची प्रकृती आता उत्तम असून तेथील अन्य कार्यक्रमात व बैठकीत सहभागी होणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
यापूर्वी २०१८ मध्ये महाराष्ट्रात अहमदनगर येथील एका कार्यक्रमात गडकरी यांची व्यासपीठावर तब्येत बिघडली होती आणि ते भोवळ येऊन खाली पडले होते. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.