भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा होणाऱ्या निवडीला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे मंगळवारी रात्री अचानक नितीन गडकरी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत बारा तासांवर आली असताना गडकरी यांच्या फेरनिवडीला होणारा विरोध शिगेला पोहोचल्यामुळे शेवटी त्यांनी राजीनामा देऊन अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गडकरी यांच्या जागी अध्यक्षपदासाठी आता माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नावावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सहमती झाली असून, त्यावर संघानेही शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
मंगळवारच्या नाटय़मय घडामोडींमध्ये संघाचे समर्थन लाभूनही नितीन गडकरी यांची अध्यक्षपदी फेरनिवड होणार नसल्याचे  स्पष्ट झाले होते. गडकरी यांच्या नावाला विरोध करण्यात पक्षाचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी आघाडीवर होते. अडवाणींची समजूत घालण्यासाठी संघाने पूर्ण ताकद लावली, पण त्याचा उपयोग झाला नाही. मात्र अडवाणींच्या हट्टामुळे गडकरींना राजीनामा देण्यास भाग पडले असले, तरी अडवाणींना ‘नापसंत’ असलेल्या राजनाथसिंह यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविण्याचा निर्णय घेऊन संघाने अडवाणींना त्यांची जागा दाखवून दिली.
 पूर्ती उद्योग समूहातील कथित संशयास्पद आर्थिक व्यवहारांमुळे गडकरी यांची प्रतिमा वादग्रस्त ठरली होती. त्यातच भाजपच्या अध्यक्षपदाची  निवडणूक होत असताना गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाशी संबंधित आठ कंपन्यांवर धाडी घालण्यात आल्याने त्यांच्या फेरनिवडीला विरोध करणाऱ्या दिल्लीतील भाजप नेत्यांचा विरोध आणखीच तीव्र झाला. आयकर खात्याने राजकीय सुडापोटी पूर्तीशी संबंधित कंपन्यांवर धाडी घालून भाजप कार्यकत्यार्ंना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गडकरींनी केला. भाजपच्या काही नेत्यांनी केंद्र सरकारमधील मित्रांच्या ‘सौजन्या’ने पूर्ती उद्योग समूहाशी संबंधित कंपन्यांवर धाडी घालून फेरनिवडीच्या पूर्वसंध्येला गडकरींवर निर्णायक क्षणी चिखलफेक केल्याची चर्चा आहे.  

जेटलींच्या बंगल्यात चर्चा :   मुंबईला गेलेले अडवाणी आणि गडकरी यांच्या पश्चात दिल्लीत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या बंगाली मार्केट येथील निवासस्थानी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, माजी राष्ट्रीय अध्यक्ष वेंकय्या नायडू आणि भाजपचे संघटन महामंत्री रामलाल यांची गहन चर्चा झाली आणि त्यात ६२ वर्षीय राजनाथ सिंह यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले. राजनाथ सिंह यांच्या नावाला अडवाणी, जेटली आणि अन्य नेत्यांचा विरोध होता, पण गडकरींच्या विरोधात उभ्या झालेल्या नेत्यांना राजनाथ सिंह यांच्याच नावावर सहमती करणे भाग पडले. बुधवारी राजनाथ सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव खुद्द गडकरी मांडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Story img Loader