भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नितीन गडकरी यांनी आत्तापर्यंत अनेकदा भाजपा नेत्यांचे तसंच कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. पक्षातले वरिष्ठ नेते असोत किंवा मग पक्षातले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असोत नितीन गडकरी कुठलाही मुलाहिजा न ठेवता आपलं म्हणणं रोखठोक पद्धतीने मांडत असतात. आता पुन्हा एकदा गोव्यातल्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी भाजपा नेत्यांचे कान टोचले आहेत. चांगले दिवस आले म्हणून जुना संघर्ष विसरता कामा नये असं गडकरींनी म्हटलं आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

आपल्या पक्षात सध्या अनुकूल काळ सुरु आहे. ज्यावेळी शेतात हायब्रीड बियाणं लावलं जातं तेव्हा उत्पन्न वाढतं. पण हायब्रीड बियाणाचा जितका वापर वाढतो किंवा ते जसं डेव्हलप होतं तशी झाडांवर रोगराई वाढतो. वाईट दिवसांत आनंद होतो, चांगल्या दिवसांमध्ये घरं बरबाद होतात. समृद्ध आणि संपन्नतेच्या काळात सुख टिकवणं गरजेचं असतं. भविष्यातली उद्दीष्टं लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी लालकृष्ण आडवाणींचाही उल्लेख केला.

नितीन गडकरींचे जातीवादाबाबत विधान (फोटो – नितीन गडकरी एक्स सोशल मीडिया )

हे पण वाचा- VIDEO : “जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरींचं विधान चर्चेत!

आपण पार्टी विथ डिफरन्स

आपल्या पक्षात जे संस्कार आहेत ते शॉर्टकट नाहीत. लालकृष्ण आडवाणी हे कायम म्हणायचे वुई आर पार्टी विथ डिफररन्स. भाजपा आणि काँग्रेसमध्ये फरक काय? आपण तेच काम केलं तर आपल्या येण्याचा फायदा काय? आपलं वेगळेपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. ज्यांच्यावर नाराज होऊन आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. निवडून आल्यानंतर आपण जे काम आपण करायला नको ते केलं तर त्यांच्या (काँग्रेस) जाण्यात आणि आपल्या येण्यात काय फायदा आहे? असाही प्रश्न नितीन गडकरींनी विचारला.

चांगले दिवस आले तरीही संघर्ष विसरायचा नाही

चांगले दिवस आले की जुन्या काळातली प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्ष आपण विसरतो. मराठी भाषेत एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांचं नाव शिवाजी सावंत. त्यांनी मृत्यूंजय पुस्तकात एक सुंदर वाक्य लिहिलं आहे. विस्मृती ही माणसाला देवाने दिलेली देणगी आहे. आयुष्यातल्या कटू गोष्टी विसरता आल्या पाहिजेत. पण पुढे ते म्हणतात भविष्यात काही चांगलं करायचं असेल तर भूतकाळातल्या घटना आठवून वर्तमान काळात त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि मग भविष्याचे निर्णय घेतले पाहिजे. आपल्या पक्षात सध्या अनुकूल काळ आहे. मात्र आपण संघर्ष विसरायला नको. असं नितीन गडकरी म्हणाले. गोव्यातल्या सभेतलं त्यांचं भाषण आणि त्यांनी दिलेली ही दोन उदाहरणं चर्चेत आली आहेत.