‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : प्रशासनाचा कणा असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची सुशासनात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. चांगली कामगिरी करणारा जिल्हाधिकारी चमत्कार घडवून आणू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
प्रशासकीय सेवेचा समाजहितासाठी उपयोग करून परिवर्तन घडविणाऱ्या देशभरातील १६ जिल्हाधिकाऱ्यांचा बुधवारी सायंकाळी ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी गडकरी बोलत होते.
कृषीपासून शिक्षणापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून महिला विकासापर्यंत १६ गटांत विभागलेले हे पुरस्कार पाच केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान, केंद्रीय विधि व न्याय आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि पंतप्रधान कार्यालय तसेच ईशान्य प्रांत विकास (स्वतंत्र कार्यभार) खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. २४ राज्यांतील ८४ जिल्ह्य़ांतील २४९ अर्जामधून विजेत्यांची निवड करण्यात आली होती.
‘‘सुशासन आणि विकास हे सरकारसाठी दोन महत्त्वाचे विषय आहेत. सुशासनाचा विचार करता जिल्हाधिकाऱ्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या प्रशासनाचा कणा असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळेल. यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या स्वप्नातील नवा भारत घडेल’’, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.
हे पुरस्कार म्हणजे प्रशासकांना अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन असल्याचे पासवान म्हणाले. गरिबातील गरीब लोक राहतात अशा ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी त्यांच्या समस्या सोडवतात. हृदय आणि मन यांच्या समन्वयाने कुठलाही सामाजिक बदल घडू शकतो. मंत्री केवळ धोरणे तयार करू शकतात व सूचना देऊ शकतात, मात्र त्यांची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांना करायची असते. धोरणांची कुशलतेने अंमलबजावणी करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काम आहे, असे ते म्हणाले.
प्रसाद यांनी सांगितले की, ‘‘भारताच्या राजकीय प्रशासकीय रचनेत पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व निरीक्षक ही चार पदे अतिशय महत्त्वाची आहेत. ते सत्तारचनेचा सारांश असतात. मात्र आता जिल्हाधिकारी हा त्याचा नवा अवतार असून, तो सुशासनाचा केंद्रबिंदू बनला आहे. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तेच नियम आणि तीच नोकरशाही यांच्यासह कामे झाली आहेत. महत्त्वाचे आहे, ते काम करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणे.’’
जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘‘मी कार्मिक व प्रशिक्षण विभागाशी जोडलेला असून, आम्ही जे करणार असू ते एक्स्प्रेसने केले आहे. आमच्याकडेही अशा पुरस्कारांची व्यवस्था आहे, मात्र तुमच्या माध्यमातून करण्यात आलेले मूल्यांकन नक्कीच अधिक विश्वासार्हरित्या स्वीकारले जाईल.’’
‘‘ही सायंकाळ म्हणजे तीन वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या कल्पनेची फलश्रुती आहे’’, असे एक्सप्रेस वृत्तसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, ‘‘आमच्या भोवतालच्या बदलाला न्याय देण्यात एक्स्प्रेसची जबाबदारी काय, असा प्रश्न होता. अर्थातच आणखी शोधात्मक बातम्या देणे आणि विवरणात्मक पत्रकारिता करणे हा एक मार्ग आहे. मात्र न्यूजरूमपलीकडे आमची जबाबदारी काय आहे? जे लोक बदलाची संहिता लिहितात, त्यांचे म्हणणे ऐकून या बदलाची नोंद घेण्याचा मार्ग आम्ही शोधू शकतो काय? आणि द्वैवार्षिक ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्कार हे त्याचे उत्तर आहे.’’
जिल्हा हे आमच्या प्रशासनाचे मूळ एकक आहे. याच ठिकाणी आयएएस अधिकारी यापैकी प्रत्येक अक्षर कशासाठी आहे- इंडियन, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सव्र्हिस- हे शिकतो, असेही गोएंका यांनी सांगितले.
द इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राजकमल झा यांनी पुरस्कार विजेते व पाहुण्यांचे स्वागत केले. अनंत गोएंका यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला, तर नेक्स्टजेन इनफिनिट डेटा सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ ए. एस. राजगोपाल यांनी आभार मानले.
कुठल्याही प्रशासकाला सकारात्मक दृष्टिकोन, इतरांपेक्षा वेगळा विचार, त्वरेने निर्णय घेण्याची क्षमता आणि टीमवर्क आवश्यक असते. एखाद्या अधिकाऱ्याची कामगिरी चांगली असेल, तर तो चमत्कार घडवून आणू शकतो.
-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री