भारतातील रस्ते आणि रस्त्यांवर पडणारे खड्डे, त्या खड्ड्यांतून होणारे अपघात आणि अपघातांमुळे वाढणारं मृत्यूंचं प्रमाण या सगळ्याची चर्चा नेहमीच होताना दिसते. त्यावर सातत्याने उपाययोजना देखील केल्या जात असल्या, तरी अद्याप त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याचं दिसून आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भा मोठी घोषणा केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एका चर्चेला उत्तर देताना नितीन गडकरींनी पुढील दोन वर्ष अर्थात २०२४पर्यंतचा प्लान ऑफ अॅक्शनच जाहीर केला आहे. यावेळी गडकरींनी भारतातील रस्त्यांचं जाळं आणि त्याअनुषंगाने लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा यांच्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.
भारत करणार अमेरिकेशी बरोबरी!
नितीन गडकरींनी राज्यसभेत काँग्रेस खासदार एल. हनुमंथैय्या यांच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामध्ये ही माहिती दिली आहे. “भारतामधील रस्त्यांचं जाळं आणि संबंधित पायाभूत सुविधा २०२४पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचं नियोजन केंद्र सरकारने केलं आहे”, असं गडकरी म्हणाले. तसेच, रस्ते सुरक्षेसंदर्भात लोकांमध्ये अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे, असं देखील त्यांनी नमूद केलं.
रस्त्यांचं जाळं विस्तारणं हीच फक्त समस्या नाही, पण…
दरम्यान, नितीन गडकरींनी यावेळी भारतात रस्त्यांचं मोठं जाळं उभारणं ही सध्या समस्या नसल्याचं नमूद केलं. “भारतात रस्त्यांचं जाळं उभारणं हीच एकमेव सम्या नाही. रस्ते उभारणी तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, लोकांमध्ये जनजागृती आणि शिक्षण हे देखील मुद्दे यामध्ये महत्त्वाचे ठरतात”, असं ते म्हणाले.
सरकारसमोर ‘ही’ मोठी चिंता!
दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरींनी केंद्र सरकारसमोर असलेली मोठी चिंतेची बाब सांगितली आहे. “राष्ट्रीय महामार्गांवर वाढणारी अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांचं रूंदीकरण ही केंद्र सरकारसाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यासाठीच रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्न करत आहे. दरवर्षी देशात रस्ते अपघातात तब्बल दीड लाखांहून जास्त लोक मृत्यूमुखी पडतात. एखाद्या युद्धात मरण पावणाऱ्या लोकांपेक्षा हा आकडा मोठा आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी असे ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यात आले आहेत, जिथे एकाच ठिकाणी एकाहून अधिक अपघात होतात. त्यासंदर्भात योग्य ती पावलं उचलण्यात आली आहेत”, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.