राजेंद्र येवलेकर, लखनऊ
देशातील दारिद्रय़, इंधनाच्या आयातीवर होणारा प्रचंड खर्च व सध्याची होत असलेली इंधन दरवाढ यावर मात करून अर्थव्यवस्था बलशाली करण्याची ताकद विज्ञान तंत्रज्ञानात असून पर्यायी इंधने शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे भारतीय विज्ञान महोत्सवाच्या समारोपप्रसंगी केले.
ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करता आले पाहिजे, तसेच शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हेच साधन महत्त्वाचे आहे असे सांगून ते म्हणाले, की पर्यायी इंधनाच्या निर्मितीतून खनिज तेल आयातीवर होणारा वार्षिक ८ लाख कोटींचा खर्च कमी होईल, त्यासाठी वेगवेगळ्या इंधनांवर चालणारी वाहने विकसित केली जात आहेत, त्यात बॅटरीवर चालणारी वाहने मोठय़ा प्रमाणात खर्च वाचवतात ती बाजारातही आणली आहेत.
देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उद्य्ोगांचा वाटा २० त २४ टक्के, कृषीचा ८ ते १२ टक्के तर सेवा क्षेत्राचा ५२ ते ५४ टक्के आहे. ग्रामीण भागात अर्थसंपन्नता नसल्याने तेथून शहरी भागात मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत असून जलसंधारण, बियाणे, खते, सेंद्रिय शेती यात वैज्ञानिकांनी प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घ्यावा.
कृषी प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून किफायतशीर दरात इंधन तयार करता येते, जॅट्रोफाचे उत्पादन वाढवण्यासाठी जैवतंत्रज्ञान विकसित करावे कारण इतर ज्या वनस्पतींपासून जैवइंधन करता येते, त्या आदिवासींसाठी इतर उत्पादनांच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत आहेत. सध्या विमानाच्या इंधन आयातीवर आपण ३० हजार कोटी रु. खर्च करतो, जैव हवाई इंधन वापरले तर तो खर्च कमी करता येईल, अलिकडेच डेहराडून-दिल्ली या स्पाइसजेटच्या विमानात २५ टक्के जैव इंधन वापरले होते ते तयार करण्याचे तंत्र डेहराडूनच्या पेट्रोलियम संशोधन संस्थेने विकसित केले आहे, असे ते म्हणाले.
दिल्लीत दरवर्षी थंडीत प्रदूषणाचा प्रश्न उग्र होतो, याला कारण शेतकरी भात व इतर पिकांचे अवशेष जाळतात पण तांदळाच्या १ टन टाकाऊ भागापासून २८० लिटर जैवइंधन तयार करता येते. त्याची किंमत ३-४ रुपये लिटर असते. त्यामुळे प्रदूषणाची समस्या सुटतानाच इंधनाचा प्रश्नही मार्गी लागतो असे त्यांनी स्पष्ट केले.
गंगा स्वच्छता अभियानात जे बायोडायजेस्टर बसवले आहेत, त्यातून मिथेन मिळतो, त्यातील कार्बन डायॉक्साइड वेगळा केल्यास जैवसीएनजी तयार होतो त्यावर उत्तर प्रदेशात किमान १० हजार सार्वजनिक बस चालवता येतील, असे त्यांनी या वेळी उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना सांगितले.
सौर ऊर्जा दरात घट
मोदी सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा सौर ऊर्जेचा दर ८ ते ९ रुपये युनिट होता तो आता २ रु. ४० पैसे इतका खाली आणण्यात यश आले आहे, असे सांगून ते म्हणाले, की कचऱ्याचे सोने करण्याची ताकद विज्ञान तंत्रज्ञानात आहे. फक्त त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे.
पुणे, मुंबईत जैव मिथेनॉलवरच्या गाडय़ा
जैव मिथेनॉल हा एक इंधन पर्याय असून त्यावर नवी मुंबई, मुंबई, पुणे येथे प्रत्येकी दहा बसगाडय़ा चालवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी सांगितले, की जैव मिथेनॉल २२ रुपये लिटर असल्याने वाहतूक खर्च वाचेल. उत्तर प्रदेशात २५० साखर कारखाने असून इथॅनॉल विकून ते शेतकऱ्यांना चांगला भावही देऊ शकतील. आसाममध्ये मिथेनॉल तयार होते ते बांगलादेशला निर्यात केले जाते. आता व्होल्वो कंपनीला मिथेनॉलवर आधारित इंजिन तयार करण्याचे सुचवण्यात आले आहे.
विज्ञान तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले, की या महोत्सवात एकूण २३ कार्यक्रम झाले, त्यात स्थित्यंतरासाठी विज्ञान ही मध्यवर्ती कल्पना होती. एकूण दहा लाख जणांनी या महोत्सवास भेट दिली.
विज्ञान भारतीचे अध्यक्ष विजय भटकर यांनी सांगितले, की २१ वे शतक भारताचे असून २०४७ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनेल, विश्वगुरू म्हणून देशाला जगाचे नेतृत्व करण्याचे संधी मिळू शकते, त्यात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा वाटा राहील.
सायन्स इंडिया वेब पोर्टलचे उद्घाटन
गडकरी यांच्या हस्ते सायन्स इंडिया या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे मुलांना विज्ञानात गोडी निर्माण होईल, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, त्यांच्या आवडीची संशोधन कल्पना त्यांनी मांडली तर तज्ज्ञ मार्गदर्शक (मेंटॉर) उपलब्ध केले जातील. विज्ञान भारती व विज्ञान तंत्रज्ञान विभागाने हे पोर्टल तयार केले असून त्याचा पत्ता डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सायन्स इंडिया डॉट इन असा आहे.