आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदींना मदत केल्याच्या कारणावरून वादाच्या भोवऱयात सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मागे केंद्र सरकार आणि भाजप खंबीरपणे उभे असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले. वसुंधरा राजेंवर लावण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. गडकरी यांनी सोमवारी जयपूरमध्ये वसुंधरा राजे यांची भेट घेतली.
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना मदत केल्यानंतर वसुंधरा राजे यांनीही त्यांना मदत केल्याचे उघडकीस आले होते. वसुंधरा राजे या ललित मोदींच्या संपर्कात होत्या, अशीही माहिती पुढे आली. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एकीकडे विरोधक राजीनाम्याची मागणी करीत असताना दुसरीकडे भाजपही वसुंधरा राजे यांच्या पाठिमागे उभे राहायचे की नाही, यावरून द्विधा मनःस्थितीत सापडल्याचे दिसत होते. भाजपच्या एकाही नेत्यांने थेटपणे त्यांच्या कृतीबद्दल भाष्य केले नव्हते. सोमवारी पहिल्यांदाच नितीन गडकरी यांनी वसुंधरा राजे यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले, वसुंधरा राजे यांच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. कायद्याच्या दृष्टीने आणि तर्कसुसंगतपणे विचार केल्यास वसुंधरा राजे एकदम योग्य आहेत. त्या कुठे चुकल्या आहेत, असे वाटत नाही, असे गडकरी यांनी सांगितले. वसुंधरा राजे यांच्यासंदर्भात करण्यात येणारे राजकारण योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader