केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्ट आणि सडतोड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा गडकरी आपल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. “कोणाचा वापर करून गरज संपल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच फेकून देऊ नका” असं विधान त्यांनी केलं आहे. नागपूरमधील आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. संसदीय मंडळामधून नितीन गडकरींना वगळल्यानंतर राजकीय वर्तृळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे गडकरींचे हे विधान म्हणजे त्यांच्या मनातील खदखद तर नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
गडकरींचा उद्योजकांना सल्ला
उद्योजकांशी संवाद साधताना गडकरी यांनी रिचर्ड निक्सनचे उदाहारण दिले, “एखादी व्यक्ती तेव्हा संपत नाही जेव्हा तो हारतो. व्यक्ती तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणे सोडून देतो. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रात जनसंपर्क हीच त्या व्यक्तीची खरी ताकद असते. त्यामुळे जनसंपर्क कसा वाढता राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे”, असेही गडकरी म्हणाले.
जे ही कोणी व्यवसायात आहेत, सामाजिक कार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जर तुम्ही कुणाचा हात हातात घेतला असेल म्हणजेच त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असा सल्लाही गडकरी यांनी उपस्थित उद्योजकांना दिला.
हेही वाचा- काँग्रेसला लवकरच मिळणार नवा अध्यक्ष! येत्या १७ ऑक्टोबरला निवडणूक; २२ सप्टेंबरला निघणार अधिसुचना
गडकरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?
नितीन गडकरी यांनी आपला जुना एक किस्सा देखील सांगितला. गडकरी म्हणाले “जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही”, असे गडकरी म्हणाले.