केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या विषयावरुन भाष्य केलं आहे. वेदान्त-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प आणि त्यानंतर विमान निर्मितीचा टाटा एअरबसचा प्रकल्प एका पाठोपाठ एक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन गडकरींना ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी प्रकल्प कुठे सुरु करायचे हे राज्य सरकारच्या हातात नसतं. प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तो कुठे सुरु करायचा याचा अधिकार असतो असंही मत व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> ‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणाले, “मोदींनी मला सांगितलं की, शिंदेजी हे…”

भाजपाची महाराष्ट्रात सरकार असूनही असं का होत आहे की एका मागून एक वेगवेगळे प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. आधी वेदान्त-फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबसचा प्रकल्पही गुजरातला गेला. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सरकार असूनही गुंतवणूकदार महाराष्ट्र सोडून गुजरातला चालले आहेत, असा थेट प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरींनी, “पहिली गोष्ट अशी की भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यातही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढत आहे. मी नागपूरचा आहे. आमच्याकडे टालची फॅक्ट्री आहे. जे एअरबस आणि बोईंग दोघांचे सुटे भाग बनवतात. तिथे आता राफेल आणि फाल्कनही बनवत आहेत. उद्योगधंदे अनेक ठिकाणी जातात. उद्योग कुठे स्थापन करायचा कुठे नाही हा गुंतवणूकदाराचा अधिकार असतो. हे राज्याच्या हातात नसतं. गुंतवणूकदाराचा अधिकार असतो की उद्योग कुठे सुरु करायचा,” असं गडकरी म्हणाले.

नक्की वाचा >> “तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात? आमच्यासारखं अचानक की…”; शिंदे हसतच म्हणाले, “मी जी हिंमत…”

महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये सध्या उद्योगधंदे सुरु असल्याचं नमूद करताना गडकरींनी मोठ्या प्रमाणात मूलभूत सेवा निर्माण झाल्याचं म्हटलं. “महाराष्ट्रामध्ये वाहनउद्योगातील कंपन्या आहेत. मर्सिडजी इलेक्ट्रीक गाडी मी नुकतीच लॉन्च केली त्याची कंपनी पुण्यात आहे. अनेक मोठ्या वाहननिर्मिती कंपन्या पुण्यात आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात बराच विकास झालेला आहे.
आधी विदर्भ, मराठवाडा पिछाडीवर असल्याचा वाद व्हायचा. विदर्भ, मराठवडा आणि कोकणाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जायचा. पण आता सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसतोय,” असं गडकरी म्हणाले.

नक्की वाचा >> ‘शिंदे गट’ भाजपामध्ये जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘भाजपाचा मुख्यमंत्री’ असा संदर्भ देत म्हणाले, “आम्ही लोक…”

मी सुद्धा मिहानमध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी टाटाला पत्र लिहिलं होतं. त्यांच्या अध्यक्षांचं पत्रही आलं, असा संदर्भ गडकरींनी बोलता दिला. त्यावरुन मुलाखतकाराने निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राऐवजी गुजरातला उद्योजक जात आहे, असं गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचासंदर्भ देत प्रश्न विचारला. तसेच टाटांकडून गडकरींना उत्तर आल्याचा मुद्द्यावरुन, “तुम्हाला उत्तर आलं पण त्यांनी पैसे तिकडे लावले आणि तुम्हाला आपण बोलू असं सांगितलं,” असं म्हटलं. यावर गडकरींनी उत्तर देताना, “असं नाहीय. टाटाचा टाल नावाचा मोठा प्रोजेक्ट मी मिहानमध्ये नागपूरला घेऊन गेलो. फाल्कन, राफेचे भाग तिथे बनवतात. हळूहळू क्षमता असेल त्या ठिकाणी उद्योग वाढतात. प्रत्येक जागेच्या काही सकारात्मक आणि नकारात्मक बाबी असतात. कच्चा माल, कर सवलत यासारख्या गोष्टींचाही परिणाम होतो. काही राज्यांमध्ये अधिक करसवल दिली जाते. महाराष्ट्रही गुजरातप्रमाणेच प्रगतीच्या वाटेवर आहे,” असं म्हटलं.

दुपारी आदित्य ठाकरे म्हणाले की वरुन दबाव आहे की गुजरातला जा, असा संदर्भ देत गडकरींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गडकरींनी, “असा दबाव कोणावर नसतो. हे सर्व राजकारण असतं. कारण नसताना लोक राज्यांवरुन वाद घालतात आणि तुमच्यासारखी माणसं ते चालवत राहतात,” असं खोचक उत्तर दिलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari on why vedanta foxconn tata airbus project moved from maharashtra to gujrat scsg