नागपुरातून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीला आपण लागणार असून, राजकारण आणि मुक्काम मात्र दिल्लीतच करणार आहोत. दिल्लीतून आता परत जाणार नाही, असे भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पूर्ती उद्योग समूहातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणारे गडकरी यांची पाठराखण करण्याऐवजी त्यांची कोंडी करून राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पक्षातील बडय़ा नेत्यांनी भाग पाडल्याने भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात कटुता निर्माण झाली आहे. गडकरींना अकस्मात अध्यक्षपद सोडावे लागल्याने अनेक नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
राजनाथ सिंह यांची बुधवारी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप मुख्यालयातून आपल्या १३, तीनमूर्ती लेन येथील निवासस्थानी परतल्यानंतर गडकरी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटीगाठींमध्ये मग्न झाले होते. मनातील व्यथा चेहऱ्यावर झळकू न देता या धक्क्यातून सावरल्याचे ते भासवत होते. सांत्वन करायला आलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावत होते. आपल्यावरील आरोपांची पुढच्या तीन-चार महिन्यांतच शहानिशा होऊन त्यातून आपण बाहेर पडू, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. अध्यक्षपदाच्या फेरनिवडीला अपशकुन घडविण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष चौधरी यांच्या इशाऱ्यावरून पूर्ती उद्योगाशी संबंधित कंपन्यांवर धाडी घालण्यात आल्याचा आरोप गडकरी समर्थकांनी केला आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी ते नागपुरात चार दिवस मुक्कामाला असून, नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा