केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामावरून ओळखले जातात. देशभरात त्यांनी निर्माण केलेले रस्ते आणि उड्डाण पुलांचे जाळे हे सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय त्याचे आपल्या विभागाच्या कामांवर किती बारकाईने लक्ष असते याचाही अनेक ठिकाणी होणाऱ्या कामांमधून प्रत्यत्य आलेला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एका रस्त्याच्या खराब कामामुळे जनतेची जाहीरपणे माफी मागितल्याचे आता समोर आले आहे. नितीन गडकरींच्या या कृतीवर अनेक प्रतिक्रया उमटत आहेत, शिवाय त्यांचे कौतुकही होत आहे.
मध्य प्रदेशमध्ये एका कार्यक्रमास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवरांची हजेरी होती.
नितीन गडकरी म्हणाले, “जर चूक असेल तर त्यासाठी माफी मागण्यात मला काही कमीपणा वाटत नाही. मंडला ते जबलपूर जो मार्ग आहे, त्यामध्ये बरेला ते मंडला हे ४०० कोटींचे ६३ किलोमीटरचे जे दोन लेनचे काम होत आहे, त्यावर मी समाधानी नाही. आता समस्या ही आहे, की अनेक अडचणी आल्या आहेत आणि अनेकदा तुम्हाला त्रास होत आहे. आज मी इथे येण्या अगोदरच माझी अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. प्रलंबित कामाला स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. झालेले काम अगोदर दुरूस्त करा, नवीन कंत्राट काढा आणि लवकर हा रस्ता चांगल्याप्रकारे पूर्ण करून द्या, असं मी त्यांना सांगितलं आहे. आतापर्यंत यामुळे तुम्हाला जो त्रास झाला आहे, त्यासाठी मी माफी मागतो.”
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमधील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षाही चांगला असल्याचा दावा केला होता. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना त्यांचा हा दावा जाहीर कार्यक्रमात खोडून काढल्याचे दिसून आले. ४०० कोटींचा खर्च करून तयार होत असलेला ६३ किलोमीटरचा रस्ता खराब असल्याचे पाहून वाईट वाटल्याने गडकरींनी शिवराज सिंह चौहान यांच्या समक्ष जनतेची माफी मागितली. रस्ता कामावर मी समाधानी नसल्याचं गडकरींनी म्हणताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवल्या.