केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. त्याशिवाय त्यांच्या विविध उपक्रमांबाबतच्या संकल्पनाही चर्चेचा विषय ठरतात. या गोष्टी मांडताना आपल्याच सरकारमधील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्यातही गडकरी मागेपुढे पाहात नाहीत. या पार्श्वभूमीवर सध्या पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषांवर छेडलेल्या आंदोलनाबाबत नितीन गडकरींनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत भूमिका मांडली आहे. त्यात देशातला शेतकरी, मजूर, गरीब आज दु:खी असल्याचं गडकरी म्हणाले आहेत. काँग्रेसनं यासंदर्भातला व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
शेतकरी आंदोलनाबाबत नितीन गडकरींना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “तांदूळ, मका, साखर, गव्हाचं अतिरिक्त उत्पादन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हरियाणामध्ये तर गहू आणि तांदूळ ठेवण्यासाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म वापरावे लागले. आपल्याकडे साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नाहीये”, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
“शेती उत्पादनांचा भाव मागणी व पुरवठ्यानुसार ठरतो. पण आपल्याकडे धान्याच्या किमतींमध्ये फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या परवडेनाशी झाली. माझ्या आयुष्याचं ध्येय हे आहे आहे की या देशाचा शेतकरी फक्त अन्नदाता नसून ऊर्जा उत्पादकही व्हावा”, अशी भूमिका गडकरींनी मांडली.
..आणि गडकरींनी नेमक्या समस्येवर बोट ठेवलं!
“देशाच्या विकासात कृषी क्षेत्रातील विकासाचा जीडीपीमधील हिस्सा १२ टक्के आहे, उत्पादन क्षेत्राचा हिस्सा २२ ते २४ टक्के तर सेवा क्षेत्राचा हिस्सा ५२ ते ५४ टक्के आहे. कृषी विभागावर ६५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. गांधीजी होते तेव्हा ९० टक्के लोकसंख्या गावात राहात होती. हा ३० टक्क्यांचा फरक कसा पडला? कारण आज गावोगावचा मजूर, शेतकरी दु:खी आहे. कारण जल, जमीन, जंगल आणि जनावर, ग्रामीण, शेती, आदिवासी भाग या ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाहीये. चांगली रुग्णालयं नाहीत. चांगल्या शाळा नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगले दर मिळत नाहीत”, अशा शब्दांत गडकरींनी समस्येवर बोट ठेवलं.
“ग्रामीण भागात, शेती क्षेत्रात शाश्वत विकास झाला आहे. पण ज्या प्रमाणात इतर क्षेत्रांत विकास झाला, तेवढा झाला नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्हीही खूप काम केलं. या परिस्थितीवर उपाय हाच आहे की देशात १६ लाख कोटींचं फॉसाईल फ्युएल आयात होतं. यातला ५ लाख कोटींचं इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन जरी शेतकऱ्यांनी उत्पादित केलं, तरी आपल्या देशातला शेतकरी सुखी, समृद्ध होईल. गावागावांत रोजगार निर्माण होईल”, असं गडकरी म्हणाले.