आपल्या कामांमुळे आणि निर्यणांमुळे कायमच चर्चेत असणारे मंत्री म्हणजे नितीन गडकरी. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असणाऱ्या गडकरींनी मंगळवारी देशातील वेगवेगळ्या विद्यापिठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गडकरींनी अनेक गोष्टींसंदर्भात खुलासा केला. यामध्ये त्यांनी भाजपा पक्ष का सोडला नाही यासंदर्भातही भाष्य केलं. करोना परिस्थितीमध्ये संकटांना तोंड द्यावं लागणार आहे आणि हा लढा आपल्याला लढायचा आहे असं सांगताना गडकरींनी १९८० च्या कालावधीमधील एक आठवण सांगितली. भाजपा न सोडण्यासाठी अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षांकडून प्रेरणा मिळाल्याचा उल्लेख गडकरींनी केलाय.
नक्की वाचा >> नितीन गडकरींनी सांगितला YouTube वरुन होणाऱ्या कमाईचा आकडा; म्हणाले, “आज मला महिन्याला…”
“मी विद्यार्थी परिषदेमधून भाजपामध्ये आलो. १९८० चा कालवधी होता. अटलजी निवडणूक हरले होते. आमच्या पक्षाची परिस्थिती बिकट होती. तेव्हा सर्वजण निराश होते. जनता पार्टीनंतर एवढा मोठा पराभव झाल्याने सगळ्यांनीच अटलजी, अडवाणीजींना काही भविष्य नाही, या पक्षालाही काही भविष्य नाही. हा पक्ष संपला आहे. या पक्षाला काही आधार नाहीय, अशी टीका करण्यास पत्रकारांनी सुरुवात केलेली,” असं गडकरी म्हणाले.
या सर्व परिस्थितीमध्ये आपल्यालाही अनेकदा निराशा झाल्यासारखं वाटायचं असंही गडकरींनी सांगितलं. “तेव्हा मालाही अनेकदा निराश झाल्यासारखं व्हायचं. लोक म्हणायची तू चांगला आहेस पण पक्ष चांगला नसल्याने इथे तुझं भविष्य चांगलं नाहीय. पण जे काही आहे पक्ष आमचा आहे, विचार आमचे आहेत तर मी पक्षासोबतच राहणार अशी भूमिका मी घेतली,” असं गडकरी म्हणाले.
नक्की पाहा >> व्हायरल व्हिडीओ : मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या”
पुढे बोलताना गडकरींनी त्यांना मिळालेलं एक पुस्तक आणि त्यामधील एका वाक्याने दिलेल्या प्रेरणेबद्दल सांगितलं. याच कालावधीमध्ये सध्या अमेरिकत असणाऱ्या पण तेव्हा माझ्यासोबत असणाऱ्या एका आयआयटीमधील मित्राने मला एक पुस्तक दिलं होतं. ते पुस्तक अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आयुष्यावरील घडामोडींवर आधारित होतं. त्यावेळी घडलेल्या वॉटरगेट प्रकरणामुळे सर्वच स्तरामधून निक्सन यांच्यावर टीका केली जात होती. वॉशिंग्टनमध्ये जागा देण्यासाठीही स्थानिकांनी निक्सन यांना नकार देण्याएवढी त्यांची वाईट प्रतिमा निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकामध्ये एक सुंदर वाक्य होतं. “A man is not finished when he is defeated. He is finished when he quits”, असं ते वाक्य होतं. म्हणजेच माणूस कधी युद्धामध्ये हरल्यानंतर संपत नाही, तर जेव्हा तो युद्धभूमी सोडतो तेव्हा तो संपतो. या वाक्याने मला खूप प्रेरणा दिली. भगवान श्री कृष्णानेही अर्जूनाला हीच प्रेरणा दिली होती. लढाई न्यायाची आहे, धर्माची आहे. ती तुला कर्तव्याच्या भावनेनेच लढावी लागणार आहे. हे समाज हिताचं आहे, देश हिताचं आहे आणि भविष्याच्या दृष्टीने हिताचं आहे, याच विचारांनी आपण पक्ष सोडला नसल्याचं गडकरी म्हणाले.