Nitin Gadkari on Vehicle Horns: वाहतुकीचा खोळंबा ही पुणे-मुंबईसह कोणत्याही मोठ्या शहरातली तेवढीच मोठी समस्या ठरली आहे. त्यात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत पडणारी भर ही समस्या अधिकच भीषण करत आहे. पण वाहतुकीच्या खोळंब्याबरोबरच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ध्वनीप्रदूषणाचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण जेवढी जास्त वाहनं, तेवढे कर्कश्श्य हॉर्न आणि तेवढं ध्वनीप्रदूषण! पण आता यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतला असून वाहनांमध्ये हॉर्नऐवजी भारतीय संगीत वापरलं जावं, यासाठी कायदा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना वाहनांमधील कर्णकर्कश्श्य हॉर्नचा मुद्दा उपस्थित केला. या हॉर्नच्या आवाजांमुळे रस्त्यांवरील वाहनचालकांना मोठ्या आवाजाचा त्रास तर होतोच, पण त्याचबरोबर आसपासच्या निवासी संकुलांमधील रहिवाश्यांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक भागांत घरांमध्ये वृद्ध किंवा रुग्ण राहात असतात. त्यांनादेखील या हॉर्नचा त्रास होतो. त्यामुळेच, त्यावर भारतीय सुमधुर संगीताचा तोडगा नितीन गडकरींनी काढला आहे.

कर्कश्श्य हॉर्न नव्हे, सुरेल संगीत!

वाहनांमध्ये हॉर्नच्या ऐवजी बासरी, तबला, व्हायोलिन किंवा हार्मोनियमसारख्या वाद्यांचे आवाज वापरण्यात यावेत, अशा प्रकारचा कायदा संसदेत प्रस्तावित करण्याचा विचार आपण करत असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी त्यांनी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या वायू प्रदूषणाचाही मुद्दा उपस्थित केला. वाहनांमधून होणाऱ्या वायू उत्सर्जनामुळे देशातील एकूण वायू प्रदूषणापैकी ४० टक्के प्रदूषण होत असल्याचं गडकरी म्हणाले. याचाच सामना करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने मिथेनॉल, इथेनॉलसारख्या हरित व जैव इंधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यायला सुरुवात केल्याचं गडकरी म्हणाले.

चार वर्षांपूर्वीही मांडला होता हॉर्नचा मुद्दा

दरम्यान, नितीन गडकरींनी चार वर्षांपूर्वीही वाहनांमधील हॉर्न बदलून तिथे संगीत लावण्याच्या मुद्द्याचा उल्लेख केला होता. २०२१ मध्ये भारतीय वाद्यांचा उपयोग वाहनांमध्ये हॉर्न म्हणून करणे, त्यांची वारंवारिता कमी ठेवणे यासंदर्भात सविस्तर कायदा प्रस्तावित केला जाईल, असं नितीन गडकरी म्हणाले होते. आता पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून त्यावर सोशल मीडियावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.