Nitin Gadkari On Road Sefty: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या बेधडक आणि स्पष्ट विधानांसाठी ओळखले जातात. आता नुकतेच त्यांनी भारतातील वाहतूक नियमांचे पालन न करण्यांवर उपहासात्मक टिप्पणी केली आणि म्हटले की, देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला ‘ऑलिंपिक खेळाडू’ समजतो. ते म्हणाले की, लोक कुणालाही न भीता रेड सिग्नल तोडतात आणि रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करतात.
प्रत्येक नागरिक हा ऑलिंपिक दर्जाचा खेळाडू
नितीन गडकरी म्हणाले, “लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि त्याचा आदरही नाही. अनेकजन रेड सिग्नल दिसूनही तो तोडतात. महिला त्यांच्या कडेवर मुलांना घेऊन रस्ता ओलांडतात. मी म्हणालो, इतका उंच दुभाजक बांधा की कोणीही ते ओलांडून जाऊ शकणार नाही. गाडी चालवताना फोनवर बोलणारेही असेच करतात. ते सिग्नलवर थांबत नाहीत किंवा हेल्मेट घालत नाहीत. भारतातील प्रत्येक नागरिक हा ऑलिंपिक दर्जाचा खेळाडू आहे.”
“मी आता निर्णय घेतला आहे, की जेव्हा दुचाकी खरेदीवेळीच दोन हेल्मेट दिले जातील. दंगली, हाणामारी किंवा महामारीमध्ये जितके लोक मरत नाहीत, तितके ते रस्त्यावर मरतात,” अशी टिप्पणी टाइम्स ड्राइव्ह ऑटो समिट अँड अवॉर्ड्स २०२५ या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी केली.
…त्याबद्दल माफी मागतो
यावेळी नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते अपघात रोखण्यासाठी त्यांनी काय काय उपाय योजना केल्या त्याबाबत सांगितले. तसेच ते यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत हे मान्य केले. “हे असे एक क्षेत्र आहे, ज्याबद्दल मी माफी मागतो. गेल्या १० वर्षांत रस्ते अपघात रोखण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही,” असे ते म्हणाले.
लोकसभेत चार महिन्यांपूर्वी रस्ते अपघातांबाबत माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, “खूप प्रयत्न करूनही यावर्षी १.६८ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, याची खंत वाटते. रस्त्यांवरील नियमांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यामुळे या मृत्यूंची संख्या मोठी आहे. लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे किंवा समाज यांच्या सहकार्याशिवाय अपघात कमी करणे शक्य नाही. आम्ही वाहतूक नियम न पाळणाऱ्यांसाठी दंडही वाढवला आहे पण लोक नियम पाळत नाहीत.”
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावेळी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी देशात ४.८० लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात १.७२ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २०२२ च्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीशी तुलना केली असता, अपघातांमध्ये ४.२ टक्क्यांनी आणि मृतांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२ मध्ये ४.६१ लाखांहून अधिक रस्ते अपघात आणि १.६८ लाखांहून अधिक मृत्यू झाले होते.