भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना शह देण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी जवळीक साधली आहे. बिहारच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल नितीशकुमार यांच्यासाठी मते मागताना दिसतील. लालूप्रसाद यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निवडणुकीत फटका बसण्याची भीती असल्याने नितीशकुमार यांनी केजरीवाल यांच्याशी हातमिळवणी केली. अर्थात लालूप्रसाद यादव यांच्या उपस्थितीत ३० ऑगस्टला होणाऱ्या पाटण्यातील सभेत सहभागी होण्यास केजरीवाल अनुकूल नाहीत. जनता परिवाराऐवजी जदयूच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केजरीवाल व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते बिहारमध्ये जाणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादी संबोधले होते. त्याच्या आधारावर केजरीवाल डीएनएचा मुद्दा पुढे करून भाजपविरोधात बिहारमध्ये प्रचार करतील. दिल्ली सरकारच्या बिहार सन्मान समारोहात केजरीवाल व नितीशकुमार यांनी केंद्र शासनाविरोधात यल्गार पुकारला. केजरीवाल यांनी सदैव भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. पहिल्यांदाच त्यांच्या आम आदमी पक्षाने कुण्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमात निमंत्रित केले. या कार्यक्रमात नवी समीकरणे तयार झालीत. केजरीवाल स्वत बिहारमध्ये प्रचाराला जाणार आहेत. केजरीवाल प्रचारात उतरल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून लालूंच्या विरोधात असलेली मते विरोधकांकडे वळणार नसल्याची आशा नितीशकुमार यांना आहे. त्यासाठी नितीशकुमार वारंवार दिल्लीत कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर असलेल्या बिहारी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. गेल्या सात दिवसांमध्ये नितीशकुमार तीन वेळा विविध कार्यक्रमांसाठी दिल्लीत आले होते. विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रम बिहारी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता.

Story img Loader