नितीन गडकरी यांना वजनापेक्षा जास्त बोलण्याची सवयच आहे. त्यांनी बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या एकूण पॅकेजऐवजी त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे आधी द्यावीत, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी लगावला.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींची ‘ट्विटर’च्या माध्यमातून खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी दिलेल्या पॅकेजमध्ये सर्वाधिक वाटा हा रस्ते निर्मितीसाठी आहे. एकूण पॅकेजमधील ५६ हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहेत. त्यावरून नितीशकुमार यांनी गडकरींवर टीका केली. बिहारमध्ये ४१ महामार्ग बांधण्यासाठी या पॅकेजमध्ये ५४,७१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४७,५५३ कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्या सरकारच्या काळातच मंजूर करण्यात आले आहेत. केवळ ७,१६० कोटी रुपयांचे रस्ते बांधणी प्रकल्पच या पॅकेजमध्ये नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहेत, याकडे नितीशकुमार यांनी लक्ष वेधले आणि गडकरीचा मुद्दा खोडून काढला.

Story img Loader