गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधातून उद्भवलेला अंतर्गत कलह शमत नाही तोच रालोआतील प्रमुख घटक पक्ष संयुक्त जनता दलाशी (जदयु) मोदींमुळे संबंधविच्छेद होऊ नये म्हणून झगडावे लागत आहे. तिसऱ्या आघाडीची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगून जदयुचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर दबाव वाढविला आहे. बिहारला मागास राज्याचा दर्जा दिल्यास काँग्रेस समर्थनाचा पर्यायही खुला असेल, असेही संकेत नितीश कुमार यांनी दिले आहे.
रविवारी भाजपने लोकसभा निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड केल्यापासून भाजपचे अंतर्गत तसेच जदयुसोबतचे समीकरण बिघडले आहे. बिहार विधानसभेत जदयु-भाजप युतीचे सरकार असले तरी नितीश कुमार यांना भाजपविनाही सत्तेत राहणे शक्य असल्यामुळे त्यांनी आता नरेंद्र मोदींच्या मुद्दय़ावरून भाजपला झुकविण्यासाठी ताठर पवित्रा घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासोबत तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश कुमार संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून तिसरी आघाडी स्थापन करणे शक्य असले तरी भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा करू नये, असाच नितीश यांचा प्रयत्न आहे. भाजपविना बिहारमध्ये सत्ता समीकरण जमविणे त्यांना अवघड आहे.
मोदी आणि भाजपला धडा शिकवितानाच राजकीय अस्तित्व शाबूत राखण्यासाठी नितीश यांनी तिसरी आघाडी व प्रसंगी काँग्रेसला समर्थन देण्याचा पर्याय ठेवल्याचे म्हटले जात आहे. नितीश कुमार यांचा हा आक्रमक पवित्रा बघून गुरुवारी भाजप नेत्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली. अडवाणी, राजनाथ सिंह आणि मुरली मनोहर जोशी यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. पण नितीश कुमार बधले नाहीत.