बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील जवळीक वाढत चालल्याचे संकेत मिळत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या वडिलांचे नाव एका महाविद्यालयाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पाटणा येथील आरोग्य आणि शारीरिक शिक्षण शासकीय महाविद्यालयाला दिवंगत बी. पी. सिन्हा यांचे नाव देण्याचा निर्णय मंगळवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आता या महाविद्यालयाचे नाव बी. पी. सिन्हा आरोग्य आणि शारीरिक शिक्षण शासकीय महाविद्यालय असे करण्यात आले आहे.
बिहारमध्ये यापूर्वी नितीशकुमार यांचे सरकार असताना भाजप त्या सरकारमध्ये सहभागी होते तेव्हापासून नामकरणाचा हा प्रस्ताव पडून होता. मात्र आता हा निर्णय घेण्यात आल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सिन्हा यांच्याकडून कृतज्ञता
महाविद्यालयाला आपल्या वडिलांचे नाव देण्यात आल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांचे व्यक्तिश: आभार मानले आहेत. आपले वडील महाविद्यालयाचे संस्थापकीय प्राचार्य होते, असेही ते म्हणाले. स्वपक्षीयांनी या प्रस्तावाकडे लक्ष पुरविले नाही, कारण त्यांना त्याचे गांभीर्यच समजले नाही किंवा आपल्या लोकप्रियतेमुळे त्यांना असुरक्षित वाटले असावे, असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.
महाविद्यालयास शत्रुघ्न सिन्हा यांच्या वडिलांचे नाव
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील जवळीक वाढत चालल्याचे संकेत मिळत आहेत.
First published on: 20-08-2015 at 02:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish government names college after shatrughan sinha father