बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सध्या सोयीचे राजकारण सुरू असून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे राजीनामा मागण्याचे धैर्य त्यांच्यात नाही असा टोला हिंदुस्तान अावाम मोर्चाचे (एचएएम) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी लगावला आहे.

राष्ट्रीय जनता दल याप्रकरणी काहीही भुमिका घेऊ देत मात्र, बिहार सरकार भ्रष्टाचाराविरोधात नुसत्याच गप्पा मारत आहे. नैतिक जबाबदारीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास त्यांना चांगल माहिती आहे की, कुठली गोष्ट जास्त महत्वाची आहे. जर राज्यातील युती सरकारला त्यांचा कार्यकाळ पूर्ण करायचा असेल तर नितीश यांनी त्या सर्व जणांचे राजीनामे मागायला हवेत ज्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने ठपका ठेवला आहे. अन्यथा सरकारला राज्यातील जनतेची काळजी नाही असा संदेश लोकांमध्ये जाईल असे मांझी यांनी म्हटले आहे.

नितीश हे नेहमीच स्वत:च्या सोयीचे राजकारण करीत असतात. त्यांच्यामध्ये सीबीआयने ठपका ठेवलेल्या उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे राजीनामा मागण्याचे धैर्य नाही, कारण जर तेजस्वी यांच्याकडे राजीनामा मागितला तर त्यांचे सरकार कोसळेल याची त्यांना भीती वाटत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, तेजस्वी यादव हे राजीनामा देणार नाहीत असे राष्ट्रीय जनता दलाच्या महत्वाच्या बैठकीनंतर आज जाहीर करण्यात आले. यापुढे याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, उलट तेजस्वी यादव यांची आजवरची कामगिरी दखलपात्र आहे. तेजस्वी यादव हे चांगले नेते असून ते यापुढेही राहतील असे पक्षाकडून सांगण्यात आले.

भाजपचा आम्हाला त्रास देण्याच डाव आहे मात्र, त्यांना हे शक्य होणार नाही उलट आम्ही पुन्हा पूर्वी प्रमाणे भरारी घेऊ. आमची युती तोडण्यासाठी कट रचला जात आहे, मात्र आमचे सरकार हे स्थिर असल्याचे यावर प्रतिक्रिया देताना राजदने म्हटले आहे.

रांची आणि पुरी येथील हॉटेलांचा विकास, देखभाल आणि व्यवस्थेसाठी काढलेल्या निविदांमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी शुक्रवारी सीबीआयने राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव तसेच आयआरसीटीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक पी. के. गोयल, लालूंचे विश्वासू प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी सुजाता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सीबीआयने राबडी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी केली होती.

Story img Loader