बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत विचित्र टिप्पणी केली. यामुळे महिला आमदार खाजिल झाल्या, तर पुरुष आमदारांमध्ये खसखस पिकली होती. त्यांच्या या विचित्र वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आता टीकेची झोड उठवली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विविध विभागांच्या आर्थिक परिस्थितीचा तपशील देणारा जात सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल राज्याने प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी ही अश्लिल वक्तव्य केलं.

“मुलगी शिकली, तिने लग्न केलं की, पुरुष रोज रात्री संबंध निर्माण करतात. यामुळे मूल जन्माला येते. परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. मुलगी सुशिक्षित असेल तर प्रजनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत खाली येतो आणि जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो, असं नितीश कुमार म्हणाले.

त्यांचं हे विचित्र वक्तव्य ऐकताच महिला आमदारांनी संताप व्यक्त केला. तर काही आमदार हसत होते. तसंच, २०११ च्या जनगणनेत साक्षरता दर ६१ टक्के होता. तो आता ७९ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे, अशीही माहिती नितीश कुमारांनी दिली.

नितीश कुमारांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) बाबत बोलत होते. या वक्तव्यावरून रान उठवलं जात आहे. परंतु, हे शाळांमध्ये विज्ञान, जीवशास्त्रातही शिकवलं जातं. मुलं हे शिकतात. लोकसंख्या नियंत्रणासाठी जे गरजेचं आहे ते त्यांनी सांगितलं. लैंगिक शिक्षण या अर्थानेच त्यांचा मुद्दा लक्षात घ्यावा.”

“मुख्यमंत्र्यांनी वयाची ७० वर्षे ओलांडली असून त्यांनी निरर्थक वक्तव्य केले आहे. आपण अजिबात उच्चारू शकत नाही असा शब्द त्यांनी वापरला. आम्ही सर्व महिला या विरोधात आंदोलन करू”, असं भाजपा आमदार गायत्री देवी म्हणाल्या.

“भारतीय राजकारणात नितीश कुमार यांच्यासारखा अश्लील नेता कोणीही पाहिला नाही. नितीशबाबूंना ‘बी’ ग्रेड अॅडल्ट फिल्म्सचा हव्यास आहे . त्यांच्या दुटप्पी संवादांवर (Double Meaning) जाहीर बंदी घातली पाहिजे. संगतीचे परिणाम दिसत आहेत!”, बिहार भाजपने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. “या देशातील प्रत्येक महिलेच्या वतीने आम्ही मागणी करतो की मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी. विधानसभेतील त्यांची भडक टिप्पणी म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्याच्या भाषणात वापरलेली अशी अपमानास्पद भाषा हा आपल्या समाजावर काळा डाग आहे. लोकशाहीत एखादा नेता इतक्या उघडपणे असं भाष्य करू शकतो, तर राज्याची किती भीषणता असेल याची कल्पनाच करता येईल. आम्ही अशा वर्तनाच्या विरोधात ठाम आहोत आणि माफीची मागणी करतो”, असं राष्ट्रीय महिला आयोगाकडून सांगण्यात आलं.

Story img Loader