नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी साधलेली चुप्पी अडवानी यांच्या राजीनाम्यानंतर सोडली. मोदी यांच्या निवडीनंतर संयुक्त जनता दलाचे धोरण काय असेल, हे पक्षातील ज्येष्ठ नेते एकत्र बसून ठरवतील आणि त्यानंतर माध्यमांना माहिती दिली जाईल, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी सोमवारी दिली. लालकृष्ण अडवानी यांनी दिलेला राजीनामा धक्कादायक असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. ही अतिशय धक्कादायक घटना असून, भाजपच्या इतर पक्षांसोबत असलेल्या संबंधावर याचा परिणाम होऊ शकतो, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
मोदींच्या निवडीवर नितीशकुमार यांनी रविवारी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. नितीशकुमार रविवारी ‘सेवा’ यात्रेनिमित्त माधेपुरा, अरारिया आणि भागलपूरच्या दौऱयावर होते. मोदींच्या निवडीनंतर त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास टाळले. भागलपूरमधील धरहरा गावामध्ये नितीशकुमार येणार होते. मात्र, नितीशकुमार गावातील ज्या भागात येणार होते, तो पोलिसांनी संपूर्णपणे रिकामा केला होता. पत्रकारांनाही या ठिकाणी जाऊ देण्यात आले नाही. तसेच लट्टीपकड गावातील काही मुस्लिम नेते नितीशकुमार यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनाही नितीशकुमार यांची भेट घेऊ देण्यात आली नाही. मोदींच्या निवडीबद्दल नितीशकुमार यांना कोणीही प्रश्न विचारू नये, यासाठीच पत्रकारांना आणि मुस्लिम नेत्यांना त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आल्याचे समजते.
‘… याचा भाजपच्या इतर पक्षांसोबत असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो’
नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी साधलेली चुप्पी अडवानी यांच्या राजीनाम्यानंतर सोडली.
First published on: 10-06-2013 at 03:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar breaks silence says jd u will revisit strategy