पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी संपर्कात असलो, तरी प्रादेशिक पक्षांची मोट बांधून नवी आघाडी काढण्यासंदर्भात आत्ता कोणतेही वक्तव्य करणे घाईचे ठरले, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे संयुक्त जनता दलात सध्या अस्वस्थता असली, तरी पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संयुक्त जनता दल आणि भाजपमधील संबंध बिनसले आहेत. संयुक्त जनता दलाच्या काही नेत्यांनी उघडपणे मोदी यांच्या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त करून आता वेगळा मार्ग निवडण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे म्हटले. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी या विषयावर मतप्रदर्शन केले.
भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी दूरध्वनीवरून आपल्याशी युती संदर्भात चर्चा केलीये. अडवाणी यांनी काही मुद्दे माझ्यापुढे मांडले आहेत. त्यावर जनता दलाच्या बैठकीत चर्चा होईल. त्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत मी कोणतेही वक्तव्य करू शकणार नाही, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
…आत्ता काही बोलणे घाईचे ठरेल – नितीशकुमारांचा सावध पवित्रा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संयुक्त जनता दल आणि भाजपमधील संबंध बिनसले आहेत.
First published on: 13-06-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar doesnt rule out formation of federal front with bjd trinamool