गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ चालू होती. बिहारमधील सत्तासंघर्षावर देशभरातील नागरिकांचंही लक्ष लागलं होतं. महागठबंधनमध्ये (महाआघाडी) मुख्यमंत्री नितीश कुमार (संयुक्त जनता दलचे प्रमुख) आणि लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या अंतर्गत संघर्ष होत असल्याच्या चर्चा चालू होत्या. अशातच नितीश कुमार महागठबंधनमधून बाहेर पडतील आणि भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करतील,असे दावे केले जात होते. हे दावे अखेर खरे ठरले आहेत. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काही वेळापूर्वी राजभवन येथे जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश कुमार आता भारतीय जनता पार्टीबरोबर मिळून बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहेत. आज (२८ जानेवारी) सायंकाळी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्री नेमणूक केली जाऊ शकते. राज्यपालांकडे सुपूर्द केलेल्या राजीनाम्यात नितीश कुमार यांनी लिहिलं आहे की, आम्ही महागठबंधनशी नातं तोडलं आहे.

राजीनामा दिल्यानंतर राजभवनाबाहेर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी नितीश कुमार म्हणाले, “मी नुकताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करण्यास सांगितलं आहे.” त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला. नितीश कुमार आता भाजपाबरोबर सत्ता स्थापन करतील. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता त्यांचा शपथविधी होणार असल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांना यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, तुमच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची परिस्थिती का उद्भवली? त्यावर नितीश कुमार म्हणाले, राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारल होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं. आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.

हे ही वाचा >> “मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल

नितीश कुमार म्हणाले, आम्ही आधी भाजपाबरोबर युती केली होती. ती युती तोडून यांच्याबरोबर (राजद) आघाडी बनवली. परंतु, इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar expressed on resigning as bihar cm in political crisis asc
Show comments