परिस्थिती कठीण आहे आणि अशा कठीणप्रसंगी काय करायचे, यावरच पक्षाचे सगळे नेते चर्चा करणार आहेत, हे उत्तर आहे बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांचे. दोन दिवसांच्या सेवा यात्रेचा समारोप करून शुक्रवारी पाटण्यात परतलेल्या नितीशकुमार यांना पत्रकारांनी भाजपबरोबरचा तुमचा १७ वर्षांचा घरोबा संपुष्टात येणार का, असा प्रश्न विचारल्यावर नितीशकुमार यांनी वरील सूचक वक्तव्य केले.
भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झाल्यानंतर या दोन्ही पक्षांतील संबंध विकोपाला गेले आहेत. भाजपसोबतची युती तोडण्यात यावी, यासाठी संयुक्त जनता दलातील काही नेते आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी आणि रविवारी पाटण्यात होते आहे. याच बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
एक बाजूला पक्षातील काही जण भाजपसोबतची युती खूप जुनी असल्याने ती कायम ठेवण्याच्या सल्ला देत आहेत, तर दुसऱया बाजूला परिस्थिती खूपच कठीण आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याबाबत आपल्या पक्षाने भारतीय जनता पक्षाला कोणताही इशारा दिलेला नसल्याचे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी स्पष्ट केले.

Story img Loader