बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण असल्याचे मत भाजप खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी केले. भाजप आणि जेडीयू या दोन माजी सहकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे नाव आघाडीवर आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक प्रचार समितीत समावेश न झाल्यामुळे नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या विकासकामांबाबत त्यांचे कौतुक केले.
आजघडीला देशातील काही चांगल्या आणि यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी नितीशकुमार हे एक आहेत. त्यांच्यामध्ये पंतप्रधानपदासाठी लागणारे सर्व गुण असल्याचे कौतुक पटना साहेब मतदारसंघातील खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केले. पंतप्रधानपदासाठी पात्र ठरणाऱ्या नेत्यांपैकी नितीशकुमार हेदेखील एक आहेत. मात्र निवडणुकीत विजयी ठरणारा पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात भाजपसमवेत आघाडी नाही-नितीशकुमार
भाजपचे खासदार यांनी आपल्याला पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार ठरविले असले तरी त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र यापुढील काळात भाजपसमवेत आघाडी होण्याची शक्यता नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
बोधगया मंदिरासंबंधीच्या सुधारित विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू असताना नितीशकुमार यांनी भाजपसमवेत आघाडीची शक्यता फेटाळून लावली. राजदचे विधिमंडळ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी नितीशकुमार हे भाजपसमवेत आघाडी करू शकतात, असे मत व्यक्त केले होते. त्यावर उत्तर देताना तुम्ही भाजपसमवेत हातमिळवणीं करू शकता. परंतु यापुढील काळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्यासमवेत जाण्याची बाब अशक्य असल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
मोदींविरोधी वक्तव्यामुळे प्रवक्त्यांची उचलबांगडी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध शेरेबाजी केल्याने रामकिशोर सिंग यांची राज्य भाजपच्या प्रवक्तेपदावरून प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी उचलबांगडी केली असून त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. पुढील निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला विजयपथावर नेण्याची नरेंद्र मोदी यांची क्षमता आहे का, असा सवाल करून भाजपच्या प्रवक्त्यांनी सोमवारी खळबळ माजविली होती.
रामकिशोर सिंग याचे स्पष्टीकरण समाधानकारक न वाटल्यास त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई करावयाची याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल, असे मंगल पांडे यांनी स्पष्ट केले. सिंग हे भाजपचे माजी आमदार असून त्यांना विधान परिषदेसाठी दुसऱ्यांदा उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले.