नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी सोबत बिहारमध्ये सरकार बनवलं आहे. या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र या नव्या सरकारला काही दिवस होत नाही तोच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अद्यापही भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी त्यांच्या दाव्यासोबत एक मोठा पुरावाही दिला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत किशोर म्हणाले, “नितीश कुमार हे १७ वर्षांच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात जवळपास १४ वर्षे भाजपासोबत राहिलेले आहेत. आता महिनाभरापूर्वी त्यांनी भाजपाची साथ सोडली आणि महागठबंधनसोबत सरकार तयार केलं आहे. देशभरातील अनेक लोकांना असं वाटतय की नितीश कुमार भाजपाविरोधात राष्ट्रीयपातळीवर खूप मोठी महाआघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र ही बाब फार विश्वसनीय नाही.”

हेही वाचा : प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये सुरू केली पदयात्रा; ट्वीटद्वारे सांगितला उद्देश, म्हणाले…

याशिवाय “जिथपर्यंत मला समजते, माजी माहिती आहे. नितीश कुमार बिहारमध्ये महागठबंधनमध्ये नक्कीच आहेत, परंतु त्यांनी भाजपासोबतचे आपले संपर्क बंद केलेले नाहीत आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे खासदार हरविंश नारायण सिंह जे जनता दल(यू)चे खासदार आहेत आणि ते अद्यापही राज्यसभेच्या उपसभापती पदावर कायम आहेत.” असंही किशोर म्हणाले आहेत.

तर, “नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडलेली असतानाही, हरिवंश सिंह यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि नितीश कुमारांच्या पक्षाने त्यांना राजीनामा देण्यासही सांगितलेलं नाही किंवा त्यांच्यावर काही कारवाईही केलेली नाही. ही बाब समजण्यापलिकडे आहे की ज्या आघाडीमधून तुम्ही बाहेर पडलेला आहात, त्या आघाडीत तुम्ही किंवा तुमच्या पक्षाचा एक खासदार राज्यसभेत उपसभापती सारख्या महत्त्वाच्या पदावर अद्यापही कसा काय कायम आहे? माझ्या माहितीनुसार नितीश कुमारांचा भाजपाबरोबरचा जो संपर्क आहे, तो हरिवंश सिंह यांच्या माध्यमातून कायम आहे.” असं प्रशांत किशोर यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

पाहा व्हिडिओ :-

प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पदयात्रा सुरू केलेली आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील भितिहरवा येथील गांधी आश्रमातून या पदयात्रेस सुरूवात करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांन भाजपाची साथ सोडल्यानंतर, प्रशांत किशोर यांच्या या पदयात्रेमुळे विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये मागील काही दिवसांत जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा असं प्रशांत किशोर मला म्हणाले होते – नितीश कुमारांचं विधान!

काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर हे भाजपासाठी काम करतात असं म्हटलं होतं. प्रशांत किशोर यांनी एकदा आपल्याला संयुक्त जनता दल (जदयू) काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता. ते भाजपासाठी काम करत आहेत. असं नितीश कुमार म्हणाले होते.

तर यावर उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी ‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर वाढत्या वयाचा परिणाम होऊ लागला आहे. ज्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही अशा लोकांनी त्यांना घेरले आहे. त्यामुळे ‘राजकीयदृष्टय़ा’ एकटे पडल्याची भावना त्यांना भेडसावत आहे,’’ अशी टीका निवडणूक प्रशांत किशोर यांनी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar is surely with mahagathbandhan but has not closed his channels with bjp prashant kishor msr