नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाने निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे की, “२०१९ मध्ये त्यांच्या पक्ष कार्यालयात कोणीतरी एक लिफाफा ठेवला होता. या लिफाफ्यात १० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे होते. पक्षाने काही दिवसांनी हे निवडून रोखे वटवून घेतले (रोखीत रुपांतर केले)”. जदयूने निवडणूक आयोगाला सांगितलं की, “देणगी देणाऱ्याबाबत आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही”. देशभरातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी त्यांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगासमोर सादर केली. बिहारमधील सत्तारूढ पक्ष संयुक्त जनता दलाने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांना एकूण २४ कोटी रुपयांहून अधिकचे निवडणूक रोखे मिळाले आहेत.
संयुक्त जनता दलाने निवडणूक आयोगाला सांगितलं की, त्यांना भारती एअरटेल आणि श्री सिमेंटकडून अनुक्रमे एक आणि दोन कोटी रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले आहेत. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, आम्हाला निवडणूक रोख्याच्या माध्यमातून २४.४ कोटी रुपये निधी म्हणून मिळाले आहेत. हे निवडणूक रोखे भारतीय स्टेट बँकेच्या हैदराबाद आणि कोलकाता येथील शाखेने जारी केले होते. तसेच काही निवडणूक रोखे पाटणा येथील एसबीआयच्या शाखेतून जारी करण्यात आले होते.
नेमकं प्रकरण काय?
जदयूला मिळालेल्या २४.४ कोटींच्या निवडणूक रोख्यांपैकी १० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची माहिती जदयूच्या मुख्य कार्यालयाने दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, ३ एप्रिल २०१९ रोजी आमच्या पाटणा येथील पक्ष कार्यालयात एक लिफाफा सापडला. या लिफाफ्यात १० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे होते. परंतु, हा निधी कोणी दिला याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. तसेच आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. कारण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा कोणताही आदेश दिला नव्हता. ३ एप्रिल २०१९ रोजी कोणीतरी आमच्या पक्ष कार्यालयात आला होता. त्याने एक सीलबंद लिफाफा कार्यालात ठेवला. आम्ही तो लिफफा उघडल्यानंतर त्यामध्ये १ कोटी रुपयांचे १० निवडणूक रोखे मिळाले.
हे ही वााचा >> छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल अडचणीत; ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल
निवडणूक रोख्यांद्वारे भाजपाला ६,९८६ कोटी
निवडणूक रोखे योजनेअंतर्गत राजकीय पक्षांना किती निधी मिळाला यासंबंधीचे \ तपशील निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. त्यानुसार, २०१८मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून सत्ताधारी भाजपाला सर्वाधिक म्हणजे ६,९८६ कोटी ५० लाख रुपये इतका निधी मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती हे इतर पक्ष पहिल्या चार क्रमांकातील लाभार्थी आहेत. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला १,३९७ कोटी तर तर राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला १,३३४ कोटी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. तेलंगणामध्ये १० वर्षे सत्तेत राहिलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (आधीची तेलंगण राष्ट्र समिती) खात्यात १,३२२ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने एकूण ६५६.५० कोटी इतका निधी मिळाल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी ५०९ कोटी एकटया, ‘लॉटरी किंग’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सांतियागो मार्टिनच्या मालकीच्या ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स प्रा. लि.’ या कंपनीकडून मिळाले आहे. ‘फ्युचर गेमिंग’ने सर्वाधिक १३६८ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. त्यांनी उर्वरित ८५९ कोटी रुपये कोणत्या पक्षांना दिले ते समजू शकले नाही.