बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज (रविवार, २८ जानेवारी) राजीनामा देण्याची शक्यता आहे. तीन वर्षांत दुसऱ्यांदा ते भाजपाबरोबर जातील हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. बिहारच्या पाटण्यात शनिवारी दिवसभर बैठकांची सत्र चालू होती. दुसऱ्या बाजूला, नितीश कुमार यांच्या जनता दलने (संयुक्त) पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी घरोबा केल्यास सत्तेत राहण्यासाठी काय करायचं याबाबत राष्ट्रीय जनता दल पक्षातही खलबतं चालू आहेत. पाटण्यात दोन्ही पक्षांची बैठकांची अनेक सत्रं काल पार पडली. नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजपा नेत्यांचीही बैठक झाली. सचिवालय रविवारी चालू ठेवण्यास सांगण्यात आलं आहे, यामुळेच नितीशकुमार हे रविवारी राजीनामा देतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जनता दलाचे (संयुक्त) राजकीय सल्लागार तसेच प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी बिहारमधील महाआघाडी कोसळण्याच्या बेतात असल्याचं मान्य केलं आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सातत्याने नितीशकुमार यांचा अपमान केल्याचा आरोप त्यागी यांनी केला आहे. त्याचबरोबर पंजाब आणि पश्चिम बंगालमध्येही इंडिया आघाडीतील पक्ष फुटण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यागी यांनी केला. नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपाप्रणतित राष्ट्रीय लोकशाहीशी (एनडीए) घरोबा करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच नितीश कुमार यांचा एक जुन्हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओत दिसतंय की नितीश कुमार म्हणाले होते, मी मरण पत्करेन, परंतु एनडीएमध्ये सहभागी होणं मला मान्य नाही.
नितीश कुमार एनडीएत जाण्याच्या चर्चांवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नितीश कुमार यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा नितीश कुमार म्हणाले होते, मला मरण मान्य आहे परंतु, त्यांच्याबरोबर (एनडीए) जाणं मान्य नाही, ही गोष्ट हे सर्वांना चांगलीच माहिती आहे. तुम्ही (प्रसारमाध्यमं) असं समजा की या सगळ्या बोगस चर्चा आहेत. आम्ही हा सगळा खाटाटोप का केला असेल? इतकी हिंमत करून, मेहनत करून आम्ही सत्ता स्थापन केली. लोकांनी आम्हाला मत देऊन सत्तेत बसवलं आहे. ते लोक (एनडीए) सत्तेत येण्यासाठी काहीही करू शकतात
नितीश कुमार एनडीएत सहभागी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर नितीश कुमार यांना समाजमाध्यमांवर ‘पलटू राम’ म्हटलं जात आहे.
हे ही वाचा >> पाटण्यात बैठकांचे सत्र, ‘राजद’चेही सत्तेसाठी प्रयत्न; नितीशकुमार यांचा आज राजीनामा?
नितीश कुमारांचा आठ वेळा शपथविधी!
देशातल्या काही मोजक्याच उदाहरणांपैकी नितीश कुमार असे एक नेते आहेत, ज्यांनी आजतागायत आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु, या आठ कार्यकाळांमध्ये त्यांच्याबरोबर भाजपा, राजद असे वेगवेगळे सहकारी सत्तेत होते. सतत वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी करणे, युती करून सत्तेत बसण्याच्या नितीश कुमार यांच्या या धोरणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने ‘पलटू कुमार’, ‘पलटू राम’ अशी खोचक टीकाही केली जाते. २००० साली नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २०१३ पासून गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रत्येकी दोन वेळा भाजपा आणि राष्ट्रीय जनता दलशी फारकती घेऊन नव्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.