महाराजगंज लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने फक्त बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अस्तित्वाला धक्का बसला नसून, त्यांच्या ‘सोशल इंजिनिअरींग’च्या सूत्रावरदेखील शंका उपस्थित झाली आहे. त्यांचे विरोधक लालू प्रसाद यांना मात्र महाराजगंजच्या विजयामुळे नवे बळ मिळाले. नितीश कुमारांच्या पक्षकार्यकर्त्यांचा सरकारकडून भ्रमनिरास झाल्याची जोरदार चर्चा आहे.
नितीश कुमार यांनी महाराजगंजची पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. ठोकशाही विरूद्ध विकास असे चित्र नितीश़कुमार यांनी रंगवले होते.  या एका लोकसभेच्या जागेसाठी जनतादल(यु.)चे १७ मंत्री, ७० संसद, विधानसभा व विधानपरिषद सदस्य पंधरा दिवस अहोरात्र काम करत होते. शेवटचे तीन दिवस स्वत: नितीश कुमार भर पावसात छत्री घेऊन या प्रचारमोहिमेत उतरले होते.
मुळचे महाराजगंजचे असलेले जनतादल(यु.)चे उमेदवार व राज्याचे सध्याचे मनुष्यबळ विकास मंत्री प्रशांत कुमार शशी हे नितीश कुमारांचे जुने मित्र म्हणून ओळखले जातात. सुशासन व विकासाचा चेहरा म्हणून त्यांना सन्मानाने यावेळी उमेदवारी देण्यात आली होती. या मतदार संघात दोन नंबरवर मतदान असणाऱया भूमिहार समाजातून शशी आलेले आहेत. मात्र, राजपूत समाजाचा या मतदार संघावर वरचष्मा राहिला आहे. या राजपूतांची मते लालू प्रसाद यांचा उमेदवार व कॉंग्रेसमध्ये विभागली जातील व त्याचा फायदा आपल्या उमेदवाराला होईल, असा जदयुने अंदाज बांधला होता. त्याचबरोबर दलित आणि मुस्लिम मते विकासाच्या मुदद्यावर आपल्याच उमेदवाराला मिळतील, असा देखील अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, राष्टीय जनता दलाच्या प्रभूनाथ सिंह यांनी १,३७,१२६ मतांनी शशी यांचा पराभव करत नितीश कुमारांचे सर्व अंदाज व प्रयत्न फोल ठरवले.

Story img Loader