जनता दल संयुक्तचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातील मुरब्बी खेळाडू आहेत. बिहारच्या राजकारणात २०१५च्या सुरुवातीला झालेल्या उलथापालथीत जितनराम मांझी यांच्या राजीनाम्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर या निवडणुकीपर्यंत त्यांनी पक्षाला अधिकाधिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी २००५ ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. या काळात बिहारला प्रगतिपथावर नेण्याचे श्रेय प्रामुख्याने त्यांच्याकडे जाते. राज्यात फोफावलेल्या गुंडगिरीवर त्यांनी बऱ्याच प्रमाणात वचक बसवला आणि विकासकार्याला चालना दिली. रस्ते आणि पूल बांधणी यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. राज्यात शाळांमध्ये एक लाख शिक्षकांची भरती करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष पुरवणे, मुलींची शाळेतील गळती रोखण्यासाठी त्यांना सायकल पुरवून प्रोत्साहन देणे अशा त्यांच्या योजना गाजल्या. मात्र मे २०१४ मध्ये त्यांनी देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्येही नितीश कुमार यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांनी केंद्र सरकारमध्ये वेगवेगळ्या काळात रेल्वेमंत्री, भूपृष्ठ वाहतूकमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. गैसाळ येथील रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी ऑगस्ट १९९९ मध्ये रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

नितीश कुमार यांनी पाटणा येथील नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (पूर्वीचे नाव बिहार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पाटणा) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी बिहार विद्युत मंडळात काम केले आणि नंतर राजकारणात उडी घेतली.

Story img Loader