विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील यावर बरीच चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपला आव्हान देण्याची मोर्चेबांधणी ‘इंडिया’च्या या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीत आघाडीतल्या नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यावर काही पक्षांची सहमती दर्शवली असली तरी अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत पत्रकार परिषदेत खरगे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “आधी एकत्र येऊन निवडणूक जिंकू, मग पंतप्रधानपदाचा विचार करू.” तसेच खरगे यांनी पंतप्रधानपदाबाबतच्या चर्चा नाकारल्या नाहीत.
दरम्यान, पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीत खरगेंच्या नावाचा विचार सुरू झाल्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच या बैठकीत नितीश कुमार यांच्या नावाचा उल्लेखही झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, नाराजीच्या चर्चांवर नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीश कुमार म्हणाले, आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत आहोत. इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या उमेदवारीबाबत नितीश कुमार म्हणाले, मी जरादेखील नाराज नाही. मी बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की, ज्याला पंतप्रधान व्हायचं असेल त्याने व्हावं. माझीही इच्छा नव्हती. बैठकीत मी तेच सांगितलं आहे. मी कधीच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केलेलं नाही.
नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केलं नसलं तरी जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी सातत्याने याबाबत वेगवेगळी वक्तव्ये केली आहे. जदयू आमदार गोपाल मंडल दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी म्हणाले होते की, नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत. देशभरातली जनता मल्लिकार्जुन खरगेंना ओळखत नाही. पत्रकार उल्लेख करू लागल्यानंतर काहीजण खरगेंना ओळखू लागले आहेत. देशभरातले लोक नितीश कुमार यांना ओळखतात. खरगेंना कोणीच ओळखत नाही. काही ठराविक लोक खरगेंना ओळखतात, सामान्य जनता त्यांना ओळखत नाही. त्यामुळे नितीश कुमारच पंतप्रधान होतील.
हे ही वाचा >> इंडिया आघाडी की एनडीए? सर्वाधिक श्रीमंत कोण? काँग्रेस-भाजपाव्यतिरिक्त कोणाकडे जास्त निधी?
आघाडीतल्या १६ पक्षांचा खरगेंना पाठिंबा
इंडि आघाडीला निमंत्रक किंवा समन्वयक असला पाहिजे, असा मुद्दा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या बैठकीपूर्वी उपस्थित केला होता. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडीच्या बैठकीत हाच मुद्दा उचलून पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी त्यांनी खरगेंचे नाव सुचवंले होतं. यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. उलट, द्रमुकचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरगेंच्या नावाला पाठिंबा दर्शवला. आघाडीतल्या २८ घटक पक्षांपैकी १६ पेक्षा जास्त पक्षांनी खरगेंना पाठिंबा दिला असून यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.