लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला आहे. बिहारमधील लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (जदयु) पक्षाला ४० जागांपैकी फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपने बिहारमधील ४० पैकी २३ जागांवर विजय मिळाला आहे.
या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा पत्रकारपरिषदेत केली. यंदा लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच जास्त झडल्याची नितीश यांनी सांगितले. आपल्या राजीनाम्यानंतर बिहार राज्याची विधानसभा विसर्जित करण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली. रविवारी होणाऱ्या विधिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. राजीनाम्याचा निर्णय सारासार विचार करून आणि वैयक्तिक तत्वांच्या आधारावर घेतल्याचे नितीशकुमार यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले. तसेच यापूर्वीचा भाजपशी युती तोडण्याच्या आपला निर्णय योग्य असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
दरम्यान शुक्रवारी लोकसभेच्या निकालानंतर बिहारमधील भाजपनेते सी.पी. ठाकूर यांनी संयुक्त जनता दलाचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगत बिहारमध्ये सत्तापलटाचे संकेत दिले होते. मात्र, त्याचवेळी आपण बिहार विधानसभा बरखास्त करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नसून सत्ताधारी आमदारांच्या नाराजीतूनच हे सरकार कोसळेल असे भाकित सी.पी. ठाकूर यांनी केले होते.