पीटीआय, पाटणा : एक वर्षांपूर्वी त्याग केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) परतण्याची शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी फेटाळून लावली. याला प्रत्युत्तर देताना, नितीश यांनी परत येण्यासाठी गयावया केल्या, तरी त्यांचे स्वागत केले जाणार नाही, असे भाजपने सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुमार बोलत होते.
कुमार यांच्या मंत्रिमंडळात पूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेले भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी जद(यू) चे प्रमुख नितीश यांचे वर्णन ‘शक्ती गमावलेले राजकीय दायित्व’ असे केले आणि त्यांनी नाक रगडले तरी त्यांचे पुन्हा स्वागत केले जाणार नाही, असे सांगितले. नितीशकुमार हे भाजपसोबत सत्तेत असल्यापासून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ते राजेंद्रनगर भागातील एका बागेत आले असताना हे नाटय़ घडले. भाजपशी विरोधाची भूमिका कायम असलेले राजदचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही त्यांच्यासोबत होते.
सत्तेवर आल्यानंतर, रा.स्व. संघाच्या नेत्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले जाणारे कार्यक्रम आपण थांबवू असे तुम्ही एकदा विधानसभेत म्हटले होते, असा दावा काही पत्रकारांनी केला. त्यावर, ‘मी कधीही असे म्हणालो नाही’, असे उत्तर त्यांनी दिले. यानंतर, तुमची एनडीएत परतण्याची योजना आहे काय, असे पत्रकारांनी त्यांना हसत-हसत विचारले. विरोधी ‘इंडिया’ आघाडीने नितीश यांना समन्वयक न बनवल्यामुळे ते या आघाडीत नाराज असल्याची अटकळ काही माध्यमांमध्ये व्यक्त करण्यात आली होती.